INDvsNZ टीम इंडिया ‘फ्रंटफूट’वर, कानपूर कसोटी जिंकण्यासाठी 9 विकेट्सची गरज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानपूर कसोटीवर हिंदुस्थानने नियंत्रण मिळवले असून अखेरच्या दिवशी न्यूझीलंडला विजयासाठी 280 धावांची तर हिंदुस्थानला 9 विकेट्सची आवश्यकता आहे. हिंदुस्थानने विजयासाठी दिलेल्या 284 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतान चौथ्या दिवसअखेर न्यूझीलंडने एक गडी गमावून 4 धावा केल्या आहेत. सलामीवीर टॉम लेथम 2 आणि नाईट वॉचमन म्हणून आलेला विलियम्स समरविल शून्य धावांवर नाबाद आहे.

चौथ्या दिवशी कालच्या एक बाद 14 धावांवरून टीम इंडियाने आपला दुसरा डाव सुरू केला. काल नाबाद असलेला चेतेश्वर पुजारा 22 धावा काढून बाद झाला. यानंतर आलेला कर्णधार अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावातही मोठी खेळी करू शकला नाही. 4 धावांवर असताना एजाज पटेल याने त्याला पायचित केले. रहाणेपाठोपाठ मयांक अग्रवालही 17 धावांवर बाद झाला आणि रविंद्र जाडेजा आल्यापावली माघारी परतल्याने टीम इंडियाची अवस्था 5 बाद 51 अशी झाली.

टीम इंडियाचा दुसरा डाव झटपट गुंडाळला जातो की काय असे वाटत असताना पहिल्या डावातील शतकवीर श्रेयस अय्यर आणि आर. अश्विन यांनी डाव सावरला. दोघांमध्ये 50 धावांची भागिदारी झाली. परंतु एका खराब चेंडूवर अश्विन बाद झाला आणि ही जोडी फुटली. अश्विनने 32 धावांचे योगदान दिले.

श्रेयस अय्यरची ऐतिहासिक खेळी, पदार्पणात ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू

अश्विन बाद झाल्यानंतर अय्यरने यष्टीरक्षक फलंदाज ऋद्धिमान साहा याच्यासोबत सातव्या विकेट्ससाठी 50 धावांची भागिदारी केली. या दरम्यान अय्यरने आपले अर्धशतकही पूर्ण केले. अर्धशतकानंतर चहापानापूर्वी तो 65 धावांवर बाद झाला. तोपर्यंत टीम इंडियाची आघाडी 200 पार पोहोचली होती.

चहापानानंतर साहा आणि अक्षर पटेल यांनी फटकेबाजी केली. दोघांनी मिळून टीम इंडियाची आघाडी 250 पार पोहोचवली. या दरम्यान साहा याने आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे याने 7 बाद 234 धावांवर दुसरा डाव घोषित केला आणि न्यूझीलंडपुढे विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले.

अश्विनच्या फिरकीत यंग अडकला

284 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला तिसऱ्याच षटकात धक्का बसला. सलामीवीर विल यंग याला आर. अश्विन याने दोन धावांवर पायचित केले. आता उद्या कसोटीचा अखेरचा दिवस असून न्यूझीलंड कसोटी वाचवण्यासाठी तर टीम इंडिया विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.