
रोहित शर्मानेही क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. न्यूझीलंडविरुद्ध बडोदा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या पहिल्या वन डेत तो सर्वाधिक षटकार मारणारा सलामीवीर ठरला. 301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहितने कर्णधार शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात केली. सुरुवातीला संयम राखल्यानंतर सहाव्या षटकांत बेन फॉक्सवर पहिला षटकार ठोकत त्याने आपली लय पकडली. पुढील षटकात काईल जेमिसनच्या चेंडूवरही त्याने षटकार लगावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 650 षटकारांचा टप्पा पार केला आणि हा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला.
मात्र रोहितला चांगली सुरुवात मोठय़ा खेळीत रूपांतरित करता आली नाही. नवव्या षटकात तो जेमिसनच्या चेंडूवर बाद झाला. 29 चेंडूत 26 धावांची खेळी करताना त्याने तीन चौकार आणि दोन षटकार मारले. सलामीवीर म्हणून वन डेत त्याचे आता 329 षटकार झाले असून त्याने ख्रिस गेलचा 328 षटकारांचा विक्रम मोडला आहे. गेल्या वर्षी त्याने शाहिद आफ्रिदीचा वन डेमधील एकूण षटकारांचा विक्रमही मागे टाकला होता. उत्तम फॉर्ममध्ये असलेला रोहित सध्या आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.




























































