मॅनचेस्टरवर ’20 साल बाद’, बुमराह प्रसादच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणार?

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2019 स्पर्धेत टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांत मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रफोर्ड मैदानावर सामना रंगणार आहे. बरोबर 20 वर्षापूर्वी याच मैदानावर हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. 1999 च्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या या लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानला चारीमुंड्याचित केले होते. या लढतीत टीम इंडियाने पाकिस्तानचा 47 धावांनी पराभव करत कट्टर प्रतिस्पर्ध्याविरोधात विजयरथ सुरुच ठेवला. याआधी 1992 आणि 1996 च्या वर्ल्डकपमध्येही हिंदुस्थानने पाकिस्तानचा पराभव केला होता.

पाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ !
INDvPAK CWC19 सामन्यापूर्वी व्हायरल झालेले भन्नाट मीम्स

मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या या लढतीत टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली होती. सचिन तेंडुलकर आणि एस रमेश यांनी टीम इंडियाला 37 धावांची सलामी दिली. त्यानंतर सचिनच्या 45, राहुल द्रविडच्या 61 आणि अझरुद्दीनच्या 59 धावांच्या बळावर 50 षटकात 6 बाद 227 धावा केल्या आणि पाकिस्तानसमोर 228 धावांचे आव्हान ठेवले.

World Cup 2019 कोहली माझ्याहून सरस कर्णधार – कपिलदेव

सईद अन्वर, शाहिद आफ्रिदी, इंझमान-उल-हक यासारख्या तगड्या फलंदाजीसमोर टीम इंडियाने दिलेले माफक आव्हान छोटेसे होते. परंतु वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद आणि जवागल श्रीनाथच्या धारधार गोलंदाजीने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. व्यंकटेश प्रसाद आणि श्रीनाथने पाकिस्तानची आघाडीची फळी कापून काठली आणि त्यांची अवस्था 5 बाद 78 अशी केली. यानंतर मोईन खान आणि इंझमाममध्ये चांगली भागिदारी झाली. परंतु 34 धावांवर असणाऱ्या मोईनला व्यंकटेश प्रसादने बाद केले आणि टीम इंडियासाठी विजयाची कवाडे उघडले. त्यानंतर श्रीनाथने अब्दुल रझ्झाक आणि प्रसादने वसिम अक्रमला बाद केले. पाकिस्तानचा संपूर्ण संघ 180 धावांमध्ये गारद झाला आणि हिंदुस्थानने 47 धावांनी विजय मिळवला. पाच बळी घेणाऱ्या व्यंकटेश प्रसादला सामनावीर पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बुमराहच्या  कामगिरीकडे सर्वांचे लक्ष
आज मॅनचेस्टरमध्ये टीम इंडियाचा पाकिस्तानशी सामना रंगणार आहे. या लढतीत फॉर्मात असणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. 1999 मध्ये व्यंकटेश प्रसाद यांनी केलेल्या कामगिरीची पुनरावृत्ती घडवण्याची नामी संधी बुमराहकडे आहे. तसेच झाल्यास टीम इंडियाला वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सातवा विजय मिळवणे सहज शक्य होईल.

आपली प्रतिक्रिया द्या