
सामना ऑनलाईन, हैदराबाद
हिंदुस्थान-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये उद्यापासून दुसऱया कसोटीला सुरुवात होणार असून यावेळी विराट कोहलीची सेना मायदेशात सलग दहाव्या मालिका विजयासाठी जिवाचे रान करताना दिसेल. पाहुणा वेस्ट इंडीजचा संघ यावेळी कसोटी जिंकून दोन सामन्यांची मालिका बरोबरीत राखण्यासाठी प्रयत्नशील असेल. 1983-84 सालानंतर वेस्ट इंडीजचा संघ हिंदुस्थानात कसोटी मालिका जिंकलेला नाही. तसेच गेल्या 16 वर्षांमध्ये हिंदुस्थानचा संघ वेस्ट इंडीजविरुद्ध कसोटी मालिका हरलेला नाही. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱया कसोटीत यजमान टीम इंडियाचेच पारडे जड आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
संघामध्ये बदल?
हिंदुस्थानने पुन्हा एकदा कसोटीसाठी 12 जणांची नावे निश्चित केली असून संघामध्ये बदल करण्यात येईल अशी चिन्हे दिसत नाहीत. उमेश यादव किंवा मोहम्मद शमीला वगळून मुंबईकर शार्दुल ठाकूरला खेळवण्यात येते का हे पाहणे रंजक ठरणार आहे. तसेच वेस्ट इंडीज संघात कर्णधार जेसन होल्डर, केमर रोचचे पुनरागमन झाले आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास थोडा तरी उंचावला असेल.
आकडय़ांवर एक नजर
वेस्ट इंडीजच्या संघाला 1983-84 सालानंतर हिंदुस्थानात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यादरम्यान तीन मालिका हिंदुस्थानने जिंकल्या असून दोन मालिका बरोबरीत राहिल्या आहेत.
वेस्ट इंडीजला गेल्या 16 वर्षांमध्ये हिंदुस्थानविरुद्ध कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. 2002 सालामध्ये त्यांनी त्यांच्या देशात झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. त्यानंतर दोन देशांमध्ये झालेल्या 19 सामन्यांपैकी 10 मध्ये हिंदुस्थानने विजय मिळवलाय.
पृथ्वी शॉ याने पदार्पणात शतक ठोकले आणि आपल्या नावे अनेक विक्रम केले. त्यानंतर सर्व स्तरातून त्याच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव झाला. अनेकांनी त्याची तुलना वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यासारख्या दिग्गज खेळाडूंशी केली. आता कर्णधार विराट कोहलीने यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले, पृथ्वी शॉ याने केलेला खेळ हा त्याच्या प्रतिभेमुळे आहे. तुलनेने त्याच्या नैसर्गिक खेळावर परिणाम होऊ शकतो.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये डय़ुक्स चेंडूच्या वापराला ग्रीन सिग्नल दाखवला आहे. हिंदुस्थानातील कसोटी मालिकेत वापरल्या जाणाऱया एसजी चेंडूला त्याने विरोध दर्शवला आहे. डय़ुक्स चेंडू हा तेज गोलंदाजांसह फिरकी गोलंदाजांनाही अनुकूल ठरतो. खेळाच्या कोणत्याही स्टेजला गोलंदाज या चेंडूने सामना फिरवू शकतात.

























































