इंदापूरच्या तहसीलदारांवर वाळू माफियांचा हल्ला; लोखंडी रॉडने मारहाण, तिघांना अटक

तहसीलदार कार्यालय आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर आज दिवसा भरचौकात चार ते पाच जणांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यातून तहसीलदार आणि त्यांचे चालक सुदैवाने बचावले. दरम्यान याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

तहसीलदार पाटील हे शहरातील जुन्या पुणे-सोलापूर मार्गावरून सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास शासकीय वाहनातून आपल्या कार्यालयाकडे जात होते. त्यांची गाडी संविधान चौकात आली असताना पाटील यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी चटणीची पूड टापून, लोखंडी रॉड, गज याने हल्ला केला. त्यांनी गाडीच्या काचा लोखंडी गजाने पह्डल्या. सुदैवाने या हल्ल्यातून तहसीलदार पाटील व त्यांचे चालक मल्हारी मखरे बचावले. तहसीलदार श्रीकांत पाटील यांची इंदापूर तालुक्याची ही दुसरी टर्म असून त्यांनी अवैध धंदे, विशेषतः वाळूमाफिया यांच्यावर चाप बसविला आहे. त्यातून त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

गृहमंत्र्यांचा वचक नाही

‘तहसीलदारांवरील हल्ल्यामुळे इंदापूर येथे कायदा व सुव्यवस्था नसल्याचे दिसून येते. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हेगारांवर वचक नसल्याचे पुण्यातील कल्याणीनगर तसेच इंदापूर येथील घटनेवरून दिसून येत आहे. हल्लेखोर तसेच यामागचा सूत्रधार यांच्यावर कडक कारवाई करावी’ अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

गाडीखाली कुत्रं नाही, जिवंत माणसं चिरडली जातायत…फडणवीस, राजीनामा द्या!

पुण्यातील अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत सरकार आणि गृहखात्याचे वाभाडे काढले आहेत. गाडीखाली पुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील असे फडणवीस म्हणाले होते, आता तर गाडीखाली जिवंत माणसं चिरडली जातायत…फडणवीसांनी राजीनामा द्यावा असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार यांनी पोस्टमध्ये म्हटलेय, गृहमंत्री महोदय…आता गाडीखाली पुत्रं नाही, जिवंत माणसं चिरडली जातायत. रस्त्याने चालणारा माणूस सुरक्षित नाही. इंदापूरच्या तहसीलदारावर भरदिवसा हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालक मंत्र्यांचा पत्ता नाही. पुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता. आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या, असे त्यांनी पुढे नमूद केले आहे.