
सामना प्रतिनिधी । लातूर
लातूर लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार मधुकर संभाजी कांबळे यांनी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना जाहीर पाठींबा देऊन भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी त्यांचे पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वागत केले.
अपक्ष उमेदवार मधुकर कांबळे यांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र पालकमंत्री निलंगेकर यांना नुकतेच दिले आहे. या प्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद केंद्रे, लातूर लोकसभा प्रभारी मिलिंद पाटील, आमदार सुधाकर भालेराव, रमेश कराड, संतोष सोमवंशी यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
अपक्ष उमेदवार मधुकर कांबळे, काँग्रेस अनुसूचित जाती सेलचे प्रदेश सरचिटणीस शास्त्री चव्हाण, लातूर शहर जिल्हा प्रवक्ते अॅड. सचिन कांबळे, माजी समाज कल्याण अधिकारी शिंदे यांच्यासह अनेकांनी रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. या सर्वांचा पालकमंत्री निलंगेकर यांनी पक्षप्रवेश घेतल्याबद्दल स्वागत केले. यावेळी भाजपाचे उमेदवार सुधाकर शृंगारे, रेणापूर पं.स.चे सभापती अनिल भिसे, उपसभापती अनंत चव्हाण, भाजपचे लातूर तालुकाध्यक्ष विजय काळे, रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश हितासाठी आणि गोरगरीब जनतेसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना सुरू केल्या असून खऱ्या अर्थाने या देशाला मोदींच्या नेतृत्वाची गरज आहे याची खात्री झाल्याने लातूर लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांना जाहीर पाठिंबा देऊन त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे अपक्ष उमेदवार मधुकर संभाजी कांबळे यांनी बोलून दाखविले.






























































