इराणचा मोठा निर्णय; हिंदुस्थानसह 5 देशांसाठी ‘होर्मुझ’चा मार्ग खुला केला, परराष्ट्र मंत्र्यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने मोठा निर्णय घेतला आहे. इराणने हिंदुस्थानसह 5 देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इराणी सरकारी टीव्हीशी बोलताना याबाबत माहिती दिली. ‘रॉयटर्स’ने याबाबत वृत्त दिले आहे.

पाश्चात्य प्रसारमाध्यमांनी दावा केल्याप्रमाणे होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आलेली नाही, असे स्पष्ट करत अब्बास अराघची म्हणाले की, अनेक जहाज मालक आणि देशांनी आमच्याशी संपर्क साधून त्यांच्या जहाजांच्या सुरक्षित प्रवासाची विनंती केली होती. ज्या देशांशी आमचे मैत्रीचे संबंध आहेत किंवा ज्यांच्याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेतला आहे अशा देशांच्या जहाजांना आमचे सशस्त्र दल सुरक्षित वाट करून देत आहे.

Israel Iran War – अमेरिकेचा खतरनाक प्लॅन तयार; इराणमध्ये सैन्य उतरवण्यावर विचार सुरू

चीन, रशिया, पाकिस्तान, इराक आणि हिंदुस्थान या देशांना आम्ही परवानगी दिली आहे. हिंदुस्थानची दोन जहाजे काही दिवसांपूर्वीच येथून सुरक्षितपणे पार पडली आहेत. ज्या देशांनी आमच्याशी समन्वय साधला आहे, त्यांना भविष्यात आणि युद्धानंतरही ही सुविधा मिळत राहील, असेही अराघची यांनी स्पष्ट केले.

जे देश या संघर्षात थेट सहभागी आहेत किंवा इराणचे शत्रू आहेत, त्यांच्या जहाजांना येथून परवानगी दिली जाणार नाही. यामध्ये अमेरिका, इस्रायल आणि काही आखाती देशांच्या जहाजांवर बंदी घालण्यात आली आहे. आम्ही सध्या युद्धाच्या स्थितीत आहोत आणि हा प्रदेश युद्धक्षेत्र आहे. अशा परिस्थितीत शत्रू राष्ट्रांच्या जहाजांना प्रवेश देण्याचे कोणतेही कारण नाही, असे अराघची यांनी ठामपणे सांगितले.

Israel Iran War – रशियातून तेल घेऊन जाणाऱ्या तुर्कीच्या टँकरवर काळ्या समुद्रात हल्ला

दरम्यान, इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये 28 फेब्रुवारीपासून युद्धाचा भडका उडाला आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवरील आपली पकड आणखी घट्ट केली होती. इराणने शत्रू राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना या मार्गावरून प्रवासाची परवानगी दिली नव्हती. याच मार्गावरून जगातील एकूण तेल पुरवठ्यापैकी 20 टक्के व्यापार होतो. त्यामुळे जगावर ऊर्जा संकट घोंघावू लागले. त्यामुळे हिंदुस्थानसह अनेक देश संकटात सापडले.

Iran US Israel War – फक्त 40 दिवसांचा इंधन साठा शिल्लक, ‘या’ देशात राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी लागू, हिंदुस्थानमधील परिस्थिती काय?