मुद्दा – भारताची विविधता जाहिरातींमध्ये गैरहजर! 

 भारत हा विविधतेने आणि बहुसांस्कृतिकतेने संपन्न असा देश असूनही या वैविध्यपूर्ण लोकसंख्येला सेवा पुरविणारे जाहिरात क्षेत्र मात्र या विविधतेचे आश्चर्यकारकरीत्या सपाट व एकसुरी चित्रण करत आहे. विविध प्रांतीय किंवा स्थानिक समुदाय, शारीरिक विविधता, त्वचेचे रंग आणि वयोगट यांचे प्रतिनिधित्व अतिशय कमी प्रमाणात होत आहे आणि त्यातही LGBTQ समुदाय किंवा दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिनिधित्वाचे प्रमाण तर अगदीच नगण्य आहे. यातील काही विभिन्नता तर स्थानिक जाहिरातींमधूनही गैरहजर असल्याचे दिसत आहे. या जाहिरातींमध्ये महिलांच्या प्रतिनिधित्वाकडे सकारात्मक कल दिसून येत आहे. अर्थात तिथे या चित्रणाच्या दर्जावर अजूनही बरेच काम करणे बाकी आहे.
ही सर्व निरीक्षणे भारतीय जाहिरातींमधील मुख्य प्रवाहातील विविधता आणि समावेशकता या विषयावर अॅडव्हर्टायझिंग कौन्सिल ऑफ इंडिया (ASCI) आणि ‘यूएन वुमेन’द्वारे आमंत्रित अनस्टीरिओटाइप अलायन्स (UA) द्वारे तयार करण्यात आलेल्या “मेनस्ट्रीम डायव्हर्सिटी अँड इनक्लुसिव्हनेस इन इंडियन अॅडव्हर्टायझिंग’’ असे शीर्षक असलेल्या सुधारित अहवालाचा एक भाग आहेत. कंतार या ब्रॅण्ड रिसर्चच्या क्षेत्रातील जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनीच्या साथीने विकसित करण्यात आलेला हा सर्वसमावेशक अभ्यासनिबंध भारतीय जाहिरातींमधील विविधता आणि समावेशकतेच्या (Diversity and inclusion – D&I) जगाचा सखोल वेध घेतो आणि या क्षेत्रातील बदलते कल, आव्हाने व संधी यांवर प्रकाशझोत टाकतो.
भारतीय जाहिरातींमध्ये स्त्रियांच्या प्रतिनिधित्वामध्ये हळूहळू वाढ होत असून 45 टक्के जाहिरातींमध्ये फक्त स्त्रिया आहेत व हे प्रमाण 25 टक्क्यांच्या वैश्विक सरासरीहून अधिक आहे. स्त्री व पुरुषांच्या चित्रणामध्ये स्त्री व्यक्तिरेखा या सर्वाधिक साचेबद्ध आहेत आणि पुरुषांच्या तुलनेत त्यांना उजळ वर्णाचे व कृश शरीरयष्टीचे दाखविण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. स्त्रियांचे चित्रण हे काळजीवाहू स्वभावावर आधारलेले तर पुरुषांचे अधिकारस्थानी असलेल्या व्यक्तीच्या रूपात करण्यात आले आहे. 1 टक्क्याहून कमी जाहिरातींमध्ये LGBTQI समुदाय आणि दिव्यांग व्यक्तिरेखांचा समावेश असल्याचे या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. सुमारे 4 टक्के जाहिरातींमध्ये 65 वर्षांच्या वरील वयोगटातील व्यक्तींचे चित्रण करण्यात आले आहे.
आपल्या वांशिक ओळखींमध्ये आणि वर्णांमध्ये असलेली अंगभूत विविधता साजरी करण्याच्या बाबतीत भारत इतर अनेक बाजारपेठांपासून कोसो दूर आहे. भारतीय जाहिरातींमधील केवळ 3 टक्के जाहिरातींमध्ये वांशिक गटांतील विविधतेचे प्रतिनिधित्व दिसून आले, जागतिक स्तरावर अशा प्रतिनिधित्वाचे सरासरी प्रमाण 19 टक्के आहे. तसेच केवळ 4 टक्के जाहिरातींमध्ये त्वचेच्या रंगातील विविधता दर्शविण्यात आली आहे, ज्याची जागतिक सरासरी 27 टक्के इतकी आहे.
ASCI च्या सीईओ आणि सेव्रेटरी-जनरल मनिषा कपूर म्हणाल्या, “पुरोगामी जाहिराती समाजासाठी आणि ब्रॅण्ड्ससाठी अधिक चांगला परिणाम मिळवून देतात. साचेबद्ध चित्रणामध्ये अडकलेल्या जाहिराती भारताच्या वैविध्यपूर्ण ग्राहकवर्गाशी जोडण्याचा हुकुमी मार्ग गमावत आहेत. यूएन विमेन इंडियाच्या पंट्री रिप्रेझेंटेटिव्ह सुझन फर्ग्युसन म्हणाल्या, “अनस्टीरिओटाइप अलायन्स इंडिया नॅशनल शाखेचे निमंत्रक म्हणून आम्ही येथील जाहिरातीच्या जगामध्ये समावेशकतेच्या तत्वाची जोपासना करण्यासाठी समर्पित वृत्तीने काम करत आहोत. गेल्या दोन वर्षांमध्ये आमच्या अलायन्सने सांस्कृतिक प्रवाहाला विविधता आणि समावेशकतेच्या दिशेने नेण्यास चालना देण्यासाठी जाहिरात व प्रसिद्धी माध्यमांचा वापर करण्यास कटिबद्ध ब्रॅण्ड्स, संस्था व व्यक्तींना एकत्र आणले आहे. कांतारच्या इनसाइट्स विभागाच्या दक्षिण आशियासाठीच्या एमडी आणि सीसीओ सौम्या मोहंती म्हणाल्या, “भारतीय जाहिरातींमध्ये विविधता आणि समावेकतेच्या बदलत्या चित्रावर प्रकाशझोत टाकण्यासाठी ASCI आणि अनस्टीरिओटाइप अलायन्सबरोबर केलेल्या भागीदारीचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या संशोधनाच्या आणि सखोल माहितीच्या माध्यमातून आम्हाला एक असे अधिक समावेशक आणि अधिक व्यापक प्रतिनिधित्व करणारे उद्योगक्षेत्र घडविण्यास चालना द्यायची आहे.’’