द. आफ्रिकेपुढे हिंदुस्थानचा विजयरथ रोखण्याचे आव्हान

टी-20 क्रिकेटमध्ये आम्हाला जगज्जेते का म्हणतात, हे यजमान ‘टीम इंडिया’ने दक्षिण आफ्रिकेला पुन्हा एकदा दाखवून दिले. त्यामुळे उद्या (दि.11) न्यू चंदिगडमध्ये रंगणाऱया नव्याकोऱया स्टेडियमवर दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात हिंदुस्थानचा विजयरथ रोखण्याचे आव्हान पाहुण्या दक्षिण आफ्रिकेपुढे असेल. दुसरीकडे सलामीच्या लढतीतील दणदणीत विजयामुळे ‘टीम इंडिया’चे मनोधैर्य उंचावले असले, तरी टी-20 क्रिकेटमध्ये कधीही काहीही घडू शकते. त्यामुळेच गुरुवारी होणाऱ्या या लढतीसाठी हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे.

न्यू चंदिगडच्या स्टेडियमवर अद्यापपर्यंत एकही पुरुष आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. तरीही ‘टीम इंडिया’तील बहुतेक खेळाडू आयपीएलदरम्यान येथे खेळून गेले असल्याने या मैदानाची त्यांना पुरेशी ओळख आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांना रोखण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नाणेफेकीचा फायदा मिळणारी दमट खेळपट्टी किंवा भरपूर दव पडणारी रात्र. कटकमध्ये दक्षिण आफ्रिकेने हे प्रत्यक्ष अनुभवलं. मात्र हिंदुस्थानने सलामीच्या लढतीत नाणेफेकीचा कौल विरोधात गेल्यानंतरही आपली ताकद दाखवून देत मोठा विजय मिळवला. त्यातच दक्षिण आफ्रिकन संघ पूर्व हिंदुस्थानातून उत्तर-पश्चिमेमध्ये दाखल झाला असून न्यू चंदिगडमध्ये सरावाची संधी न मिळताच गुरुवारी पुन्हा मैदानात उतरणार आहे. हा न्यू चंदिगड मैदानावरील पहिलाच पुरुष आंतरराष्ट्रीय सामना आहे. यापूर्वी सप्टेंबरमध्ये येथे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन महिला वन डे सामने खेळले गेले होते.

अर्शदीप आणि डी कॉकमध्ये संघर्ष

अर्शदीप सिंगने सलामीच्या लढतीत पहिल्याच षटकात धोकादायक क्विंटन डी कॉकला बाद केले. टी-20 क्रिकेटमध्ये या दोघांमधील सामना नेहमीच अर्शदीपने जिंकलेला आहे. त्यामुळे दुसऱया टी-20 सामन्यातही या द्वंद्वावर सर्वांची नजर असेल. कदाचित डी कॉकला वाचवण्यासाठी दक्षिण आफ्रिका मारक्रमला पहिली स्ट्राईक देण्याचा विचार करू शकते.

परिस्थितीनुसार बदल करणार

कटकमध्ये हिंदुस्थानने रिंकू सिंग सोडल्यास जवळपास आपला संपूर्ण सर्वोत्तम संघ उतरवला होता. जर पीच कोरडे असेल तर अर्शदीपच्या जागी कुलदीप यादव खेळू शकतो. याचबरोबर फलंदाजीतील खोलीची गरज वाटल्यास अर्शदीपच्या जागी हर्षित राणा पर्याय ठरू शकतो. याशिवाय हिंदुस्थानला संघाच्या रचनेत फेरफार करण्याची गरज नाही. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने जरी मोठा पराभव पत्करला असला तरी त्यांच्या संयोजनात फारसा दोष नव्हता. तरीही लुथो सिपाम्लाच्या जागी एखादा अष्टपैलू खेळवण्याचा विचार ते करू शकतात.

हिंदुस्थानचा संभाव्य संघ – अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, शिवम दुबे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा.

दक्षिण आफ्रिकेचा संभाव्य संघ – क्विंटन डी कॉक (यष्टिरक्षक), एडन मारक्रम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेव्हाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनाव्हन फरेरा, मार्को यान्सन, लुथो सिपाम्ला/कॉर्बिन बॉश/जॉर्ज लिंडो, केशव महाराज, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्किया.

खेळपट्टी आणि परिस्थिती – न्यू चंदिगडमध्ये उंच स्टॅण्ड नसल्याने येथे दव फारसं परिणाम करत नाही. आयपीएलमध्ये येथे प्रथम फलंदाजी करणाऱया संघांचा विजयाचा रेकॉर्ड 6-5 असा आहे. 200 पेक्षा जास्त धावसंख्येचा येथे यशस्वी बचाव होतो. तसेच 111 धावसंख्यादेखील यशस्वीपणे वाचवली गेली आहे. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते,

आकड्यांची दुनिया

  • टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 षटकार आणि 100 विकेट अशी दुहेरी कामगिरी करणारे केवळ तीन खेळाडू आहेत. हार्दिक पंडय़ाला या पगंतीमध्ये बसण्यासाठी केवळ एका विकेटची गरज आहे. सध्या या यादीत सिकंदर रझा, मोहम्मद नबी आणि मलेशियाचा विरनदीप सिंह यांचा समावेश आहे.
  • जसप्रीत बुमरा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही स्वरूपांमध्ये 100 पेक्षा जास्त विकेट घेणारा पाचवा खेळाडू ठरला आहे. शाकिब अल हसन, लसिथ मलिंगा, टीम साऊदी आणि शाहिन आफ्रिदीनंतर त्याचे स्थान लागते.