जनतेचं ठरलं, मोदींची पाठवणी पक्की; पाचव्या टप्प्याच्या मतदानापूर्वी काँग्रेसची मोठी घोषणा

लोकसभा निवडणुकीत आतापर्यंत मतदानाचे चार टप्पे पूर्ण झाले आहेत. येत्या सोमवारी 20 तारखेला पाचव्या टप्प्याचं मतदान होणार आहे. या मतदानापूर्वी काँग्रेसने मोठी घोषणा केली आहे. मोदी सरकारची गच्छंती निश्चित आहे. 4 जूनला ‘इंडिया’ आघाडीचे सरकार सत्तेत येणार, असा विश्वास ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.

आमचे सरकार सत्तेत आल्यावर आम्ही गरीबांना 5 किलो नव्हे तर 10 किलो रेशन देऊ, असे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 400 पारचा दावा भाजप करत आहे. पण भाजपला निवडणुकीत 140 जागाही जिंकता येणार नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला. लखनऊमध्ये ‘इंडिया’ आघाडीची पत्रकार परिषद झाली त्यावेळी ते बोलत होते.

लोकसभा निवडणुकीचे 4 टप्पे झाले आहेत. निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी पुढे असून भाजप पिछाडीवर आहे. पंतप्रधान मोदींची घरवापसी होणार हे जनतेने ठरवले आहे. 4 जूनला ‘इंडिया’ आघाडीचे केंद्रात सरकार येईल. लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

‘इंडिया’ आघाडीची लढाई गरींबासाठी – खरगे

मी गरीब कुटुंबातून आलो आहे. संघर्ष करत इथेपर्यंत आलो. मी खूप निवडणुका लढल्या आणि जिंकल्या आहेत. 2024 ची निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्याची आहे. एका बाजूला गरीबांसाठी लढणारे पक्ष आहेत. तर दुसऱ्या बाजूला श्रीमंतांचा साथ देणारे पक्ष आहेत. ‘इंडिया’ आघाडी गरीबांसाठी निवडणूक लढत आहे. मोदी सरकार 5 किलो रेशन देत आहे. मात्र केंद्रात ‘इंडिया’ आघाडीचे सरकार आल्यास आम्ही महिन्याला 10 किलो रेशन देऊ, असे मोठे आश्वासन खरगे यांनी दिले.

इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा देणार; काँग्रेसचे आश्वासन

सर्वांनी मिळून देशाचे भवितव्य, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी एकजुटीने काम केले पाहिजे. अन्यथा आपण पुन्हा गुलाम बनू. लोकशाही नसेल तर हुकूमशाही वाढेल. यामुळे तुम्ही आपली विचारधारा असलेल्या व्यक्तीला कसे निवडणार? असा प्रश्न उपस्थित करत मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपसह पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.