
महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन दुसरे अधिवेशन सुरू झाले तरी अजुनही विरोधी पक्षनेता नियुक्त करता आला नाही. सभागृहात आमदारांनी हा मुद्दा लावून धरला असला तरी ‘इंडिया’ आघाडीला या मुद्दय़ासाठी आता रस्त्यावर उतरावे लागले आहे.राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधी स्मारक स्थळाजवळ आज सकाळी धरणे आंदोलन करून, विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाची मागणी करण्यात आली. यानिमित्ताने महायुती सरकारसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही याची आठवण करून देण्यात आली.
यावेळी ‘लोकशाही संकेत लक्षात घ्या, महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता द्या’, ‘जनतेचा आवाज रोखू नका… महाराष्ट्राला विरोधी पक्षनेता रोखू नका’, ‘अन्यायाचे राजकारण बंद करा’ अशा फलकांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला.
महायुतीच सरकार हे घोटाळेबाज आणि भ्रष्टाचारी आहे. या सरकारचे अनेक घोटाळे बाहेर येतील, त्यामुळेच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसल्याची टीका ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी केली. विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीसाठी लाजिरवाणे असून, हे सरकार लोकशाहीची हत्या करीत असल्याचा आरोप करीत, सरकारच्या या दडपशाहीविरोधात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होईल, असा इशारा देवणे यांनी दिला. तर, महायुतीचे सरकार हे ईव्हीएम घोटाळेबाज सरकार असल्याची टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली. प्राध्यापक टी. एस पाटील यांनी महायुती सरकारला लोकशाही धुडकावून हुकूमशाही आणि हिटलरशाही आणायची आहे. त्यामुळेच विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसल्याची टीका केली. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, आम आदमी पार्टी, भाकपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.