आपले पाप लपवण्यासाठी प्रसारमाध्यमांवर कारवाई, INDIA आघाडीची भाजपवर घणाघाती टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चिनी कंपनीकडून आर्थिक रसद मिळत असल्याचा आरोप करण्यात आलेल्या न्यूजक्लिक या वृत्तसंस्थेविरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाई केली आहे. या संस्थेतील काही पत्रकारांची पोलिसांनी चौकशी केली जात आहे. पोलिसांनी या छापेमारीदरम्यान पत्रकारांचे लॅपटॉप जप्त केले आहेत. डिजिटल पुरावे गोळा करण्यासाठी हे लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त मोबाईल फोन आणि हार्डड्राईव्हही पोलिसांनी जप्त केले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचा INDIA आघाडीने निषेध केला आहे.

”गेल्या नऊ वर्षांत भाजप सरकारने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, न्यूजलाँड्री, दैनिक भास्कर, भारत समाचार, काश्मीर वाला, द वायर इत्यादींना दडपण्यासाठी तपास यंत्रणा तैनात करून जाणूनबुजून प्रसारमाध्यमांचा छळ केला जात आहे. अगदी अलीकडे न्यूजक्लिकच्या पत्रकारांचाही छळ केला जात आहे. भाजप सरकार माध्यम संस्थांना भांडवलदारांच्या आधारे ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या विचारधारेचे मुखपत्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार आणि त्यांच्याशी वैचारिकदृष्ट्या जुळलेल्या संघटनांनी सत्तेसाठी सत्य बोलणाऱ्या पत्रकारांवर कारवाई करण्याचा मार्ग अवलंबला आहे. शिवाय, भाजप सरकारने माहिती तंत्रज्ञान नियम 2021 सारख्या कायद्याचा वापर करून प्रसारमाध्यमांना निडरपणे वार्तांकन करण्यापासून रोखत आहे. असे करून, भाजप केवळ आपले पाप देशातील जनतेपासून लपवत नसून ते जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मान असणाऱ्या देशाच्या लोकशाहीशीही तडजोड करत आहेत. भाजप सरकारकडून कारवाई केवळ सत्य बोलणाऱ्या मीडिया संस्था आणि पत्रकारांवरच केली जाते. गंमत म्हणजे, देशात द्वेष आणि फूट पाडणाऱ्या पत्रकारांवर कारवाई करताना भाजप सरकार हतबल झाले आहे. राष्ट्रीय हितासाठी, भाजप सरकारने देश आणि लोकांच्या चिंतेच्या खर्‍या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करणे आणि आपल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी प्रसारमाध्यमांवर हल्ले करणे थांबवणे आवश्यक आहे”, अशा शब्दात INDIA आघाडीने प्रसारमाध्यमांवरील कारवाईचा निषेध केला आहे.