ऑगस्ट क्रांती; मतचोरीविरुद्ध इंडिया आघाडीचा एल्गार, आज दिल्लीत निवडणूक आयोगावर मोर्चा

मतचोरीविरुद्ध ऑगस्ट क्रांती सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात इंडिया आघाडीने एल्गार पुकारला आहे. राजधानी दिल्लीतील आयोगाच्या मुख्यालयावर उद्या सकाळी 11 वाजता इंडिया आघाडीचा विराट मोर्चा धडकणार आहे. सत्ताधाऱयांशी संगनमत करून झालेल्या संघटित मतचोरीचा जाब या वेळी आयोगाला विचारला जाणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी या मोर्चाचे नेतृत्व करणार असून मोर्चात लोकसभा व राज्यसभेतील 300 खासदार सहभागी होणार आहेत.

महाराष्ट्र, हरयाणा निवडणुकीचा निकाल लागला तेव्हाच ‘कुछ तो गडबड है’ अशी प्रतिक्रिया देशभरातून आली होती. ही गडबड साधीसुधी नसून मतचोरीची होती. सत्ताधारी भाजप आणि स्वायत्त संस्था समजल्या जाणाऱया निवडणूक आयोगाने मिळून ती केल्याचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नुकतेच दाखवून दिले. त्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात संताप आहे. जनतेच्या या संतापाला इंडिया आघाडी मोर्चाच्या माध्यमातून वाचा फोडणार आहे.

‘संसद भवन ते निर्वाचन सदन’ असा हा मोर्चा निघेल. ‘एक व्यक्ती, एक मत’ या लोकशाही मूल्याला हरताळ का फासला गेला, मतांची चोरी कशी झाली, ती का व कशी होऊ दिली, त्यात कोणाचा सहभाग होता, या प्रश्नांची उत्तरे आयोगाकडे मागितली जाणार आहेत. मतदार फेरपडताळीला असलेला विरोध व आक्षेपही या वेळी नोंदवला जाणार आहे. या मोर्चात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेससह इंडिया आघाडीतील सर्व पक्षांचे खासदार सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोग या मोर्चाला कसा सामोरा जाणार याकडे आता देशाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सर्व खासदारांसाठी सोमवारी रात्री स्नेहभोजनाचे आयोजन केले आहे. मोर्चानंतर होणाऱया या स्नेहभोजनाच्या वेळी पुढील रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

मोहीम तीव्र, तक्रारीसाठी वेबसाईट

राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेतील घोटाळय़ाविरोधात मोहीम उघडत वेबसाईट सुरू केली आहे. ‘मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी स्वच्छ मतदार यादी आवश्यक आहे. आयोगाने पारदर्शक राहून डिजिटल मतदार यादी सार्वजनिक करावी, जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः त्याची शहानिशा करू शकतील, असे राहुल यांनी म्हटले आहे. आमच्या मागणीला तुमचा पाठिंबा असेल तर http://votechori.in/ecdemand वर नोंदणी करून किंवा 9650003420वर मिस्ड कॉल देऊन या मोहिमेत सहभागी होऊ शकता, असे आवाहनही त्यांनी केले आहे. राहुल यांच्या या आवाहनाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

राहुल गांधींना आयोगाची नोटीस

शकुन रानी नामक 70 वर्षीय महिलेने लोकसभा निवडणुकीत दोनदा मतदान केल्याचा दावा राहुल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. या प्रकरणी कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल यांना नोटीस बजावली आहे. ज्या कागदपत्रांच्या आधारे तुम्ही हा दावा केला, ती कागदपत्रे सादर करा. जेणेकरून आम्हाला सखोल चौकशी करता येईल, असे नोटिशीत म्हटले आहे.