हिंदुस्थानने इराण जिंकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो - जितेश शिरवडकर

वादग्रस्त निर्णयांमुळे खेळाडूंचे पंचांशी उडालेले खटके… यजमान देशाच्या खेळाडूंच्या बाजूने दिलेल्या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केल्यामुळे मिळालेले कार्ड… सर्व स्टेडियम इराणच्या बाजूने असताना, तसेच पिछाडीनंतरही हिंदुस्थानच्या ज्युनियर्सनी भन्नाट-सुसाट खेळ करत यजमान इराणचा 41-33 असा पराभव केला आणि दुसऱया ज्युनियर जागतिक कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानचा तिरंगा डौलाने फडकावला.

हिंदुस्थाननंतर कबड्डीवर खऱया अर्थाने मनापासून प्रेम कोण करतो? या प्रश्नाचे उत्तर पुन्हा एकदा मिळाले. इराणच्या ज्युनियर संघाने हिंदुस्थानी खेळाडूंच्या तोडीस तोड कामगिरी करीत हम भी कुछ कम नहीं है, हे कबड्डी विश्वाला दाखवून दिले. ज्युनियर स्पर्धेचे पहिले जेतेपद जिंकणाऱया इराणला दुसरे जेतेपद राखता आले नाही. पहिल्या स्पर्धेत हिंदुस्थान सहभागी होऊ शकला नव्हता. मात्र यंदा हिंदुस्थानने आपला सहभाग नोंदवला आणि आपल्या खेळाडूंनी इराणचा संघर्ष मोडून काढत ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते है, नाम है हिंदुस्थान…’ हे दाखवून दिले.

वादग्रस्त आणि संघर्षपूर्ण खेळाच्या पहिल्या सत्रात इराण हिंदुस्थानपेक्षा काकणभर सरस खेळ करत पहिल्या दहा मिनिटांतच हिंदुस्थानवर लोण चढवला. त्यामुळे मध्यंतराला खेळ थांबला तेव्हा इराण 19-18 असा आघाडीवर होता.

शेवटच्या पाच मिनिटांत हिंदुस्थान सुसाट

हिंदुस्थानने मध्यंतरानंतर घेतलेली आघाडी झुंजार खेळ करीत शेवटपर्यंत नुसती राखली नाही तर वाढवलीसुद्धा. शेवटची पाच मिनिटे शिल्लक असताना हिंदुस्थान 33-30 असा आघाडीवर होता. पण या पाच मिनिटांत त्यांनी भन्नाट चढाया आणि मगरमिठी (सुपर टॅकल) मारत सामन्यावर अशी पकड घेतली की ती इराणला सोडवताच आली नाही. ंिहंदुस्थानने वेगवान चढाया करत शेवटच्या मिनिटाला 41-33 अशा गुणांसह इराणवर मात केली आणि कबड्डीच्या जागतिक स्पर्धेवर आपले नाव कोरले.