Solar Energy Scheme – घरात तयार झालेली वीज विकता येणार, योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

उर्जेची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली असून त्या तुलनेत पुरवठा करणे हे भविष्यात कठीण जाणार आहे. हे ओळखून अपारंपारीक उर्जेला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न जगभर सुरू आहेत. केंद्र सरकारने सूर्योदय योजनेचे सूतोवाच केले असून अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात या योजनेच्या अनुषंगाने एक मोठी घोषणा केली आहे. घरांमध्ये या योजनेअंतर्गत तयार होणारी वीज ही विकली जाऊ शकेल असे सीतारमण यांनी सांगितले. सूर्योदन योजनेअंतर्गत देशातील 1 लाख घरांच्या घतावर सोलार पॅनल लावण्याचे उद्दीष्ट्य डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

22 जानेवारी 2024 रोजी प्रभू श्री रामाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना पंतप्रधान मोदी यांनी या योजनेबद्दल माहिती दिली होती. घराच्या छतावर सोलार पॅनेल लावल्याने उर्जेसाठीच्या खर्चात कपात होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पात्र लोकांच्या घरांवर सोलार पॅनेल लावण्यासाठी लवकरच अभियान सुरू केले जाणार आहे.

कोणाला लाभ मिळणार?

ज्या व्यक्तीचे वार्षिक आर्थिक उत्पन्न 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सरकारी नोकरीत असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. पात्र नागरीक त्यांच्या घराच्या छतांवर सोलार पॅनेल लावून घेऊ शकतात. यामुळे विजेचे बिल कमी होईल, पैशांची बचत होईल आणि वीज विकून आर्थिक उत्पन्नही मिळेल असा दावा केला जात आहे.

योजनेसाठी अर्ज कसा करावा ?

https://solarrooftop.gov.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे. राज्य आणि जिल्ह्याची निवड केल्यानंतर नागरिकांना त्यांची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. यानंतर नागरिकांना त्यांचा वीज बिल नंबर, वीजेसाठी येणारा खर्च अशी माहितीही द्यावी लागेल. तुमच्या छताच्या लांबी रूंदीचा तपशीलही द्यावा लागेल, ज्याच्या आधारे सोलार पॅनेल निश्चित केले जाईल आणि ते बसवले जाऊ शकेल. तुमचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर पॅनेलसाठीची अनुदानित रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाईल.