चिन्यांचा सामना करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराची 18 हजार कोटींची शस्त्रखरेदी, थंडीपासून रक्षणासाठी विशेष कपडे, तंबूही घेतले

चीनकडून सुरू असलेल्या कुरघोड्या आणि नियंत्रण रेषेवर वाढलेल्या पाकिस्तानच्या हालचाली यांचा प्रभावीपणे प्रतिकार करता यावा म्हणून हिंदुस्थानी लष्कराने 18 हजार कोटी रुपयांची शस्त्रखरेदी केली. त्यातील पाच हजार कोटी रुपयांची खरेदी ही तातडीचा खर्च या बाबीखाली करावी लागली अशी माहिती लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी लष्कर दिनानिमित्त दिली.

तातडीचा खर्च म्हणून पाच हजार कोटी रुपयांचे 38 व्यवहार केले गेले. त्यात शस्त्रास्त्रांबरोबरच अन्य साधनेही खरेदी केली गेली. त्याचबरोबर 13 हजार कोटी रुपयांचे इतर करारही करण्यात आले आहेत असे जनरल नरवणे यांनी सांगितले. लडाखमधील रक्त गोठवणाऱया थंडीपासून जवानांचे संरक्षण करण्यासाठी विशेष साहित्य खरेदी केले गेले आणि त्याबरोबरच त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठीही पावले उचलली गेली असे त्यांनी सांगितले.

लडाखमधील कारवाईला ‘ऑपरेशन स्नो लेपर्ड’ असे नाव देण्यात आले होते. त्यात जखमी किंवा शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी भरघोस पेन्शन व अन्य आर्थिक मदत दिली गेली.

गलवान खोऱयात झालेल्या त्या कारवाईत 20 जवान शहीद झाले होते आणि अनेक जखमी झाले होते. लडाखमधील मायनस 40 डिग्री तापमानात कर्तव्य बजावणाऱया जवानांसाठी विशेष कपडे, तंबू व अन्य साहित्य अमेरिकेतून मागवण्यात आले होते असे जनरल नरवणे यांनी सांगितले.

लाईट मशिन गन्स, हलकी वाहने, जवानांसाठी सुरक्षा साधने, जवानांना वाहून नेणारी वाहन, लांब पल्ल्यावर मारा करणारी शस्त्रे तसेच अद्ययावत दळणवळणाची साधने खरेदी केली गेल्याचे जनरल नरवणे यांनी सांगितले.

लष्कराच्या अत्याधुनिकीकरणासाठी भविष्यात 32 हजार कोटी रुपयांच्या योजना राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या