Khamenei Death – अखेर ५ दिवसांनी हिंदुस्थानकडून खामेनींच्या निधनावर शोक व्यक्त, परराष्ट्र सचिव इराणच्या दूतावासात; पंतप्रधान मोदींचे अद्यापही मौन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च धार्मिक आणि राजकीय नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा केंद्र सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर हिंदुस्थानच्या भेटीवरून रवाना होणारी इराणची युद्धनौका अमेरिकेच्या पाणबुडीने हिंदी महासागरात उडवून दिली. या घटनेवरही केंद्र सरकारकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. यामुळे काँग्रेससह इंडिया आघाडीतील विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवर आणि परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली. अखेर केंद्र सरकारने ५ दिवसांनी खामेनी यांच्या मृत्यूवर फक्त शोक व्यक्त केला आहे. पण खामेनींवर झालेल्या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलेला नाही.

खामेनी यांच्या निधनानंतर हिंदुस्थान सरकारने पाच दिवसांनी अधिकृतपणे शोक व्यक्त केला आहे. देशाचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिल्लीतील इराणी दूतावासात जाऊन शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली आणि खामेनी यांच्याबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

यानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये मध्य पूर्वीतील चिघळती परिस्थिती कशी कमी करता येईल, यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. एस. जयशंकर यांनी गुरुवारी दुपारी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधला. या संभाषणाची माहिती त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टद्वारे दिली. जयशंकर यांनी म्हटले की, “आज दुपारी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांच्याशी टेलिफोनिक चर्चा झाली.”

इराण हा हिंदुस्थानचा एक चांगला मित्र देश आहे. यामुळे खामेनी यांच्या मृत्यूवर हिंदुस्थान सरकारकडून किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त करण्यात आला नाही किंवा प्रतिक्रियाही दिली गेली नाही. यावरून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला धारेवर धरले. आता केंद्र सरकारकडून ५ दिवसांनी शोक व्यक्त करण्यात आला असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्यापही मौन बाळगून आहेत.

इराणमध्ये १९८९ पासून सत्तेवर असलेले अयातुल्ला अली खामेनी यांच्या निवासस्थानावर अमेरिका आणि इस्रायलने ३० क्षेपणास्त्रांचा मारा केला होता. या भीषण हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य आणि ४० वरिष्ठ कमांडर्सचा मृत्यू झाला. खामेनी यांची पत्नीही या हल्ल्यात गंभीर जखमी झाली. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात खामेनी यांचा मृत्यू झाला होता.