रुग्णसंख्या वेगाने वाढतेय, पण इतर देशांच्या तुलनेत आपल्यासाठी ‘या’ 2 गोष्टी दिलासादायक

5219

देशात गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. दररोज जवळपास 8 ते 9 हजार रुग्ण आढळत आहेत. गेल्या 24 तासातही 9 हजारांहून अधिक रुग्ण आढळल्याने हिंदुस्थान इटलीला मागे टाकत सहाव्या स्थानावर पोहोचला. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असले तरी हिंदुस्थानसाठी रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आणि मृत्युदर या दोन गोष्टी अजूनही जमेच्या बाजू आहेत.

शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशातील कोविड-19 च्या सद्यस्थितीची माहिती दिली. देशात आजपर्यंत 2 लाख 36 हजार 657 रुग्ण आढळले असून 1 लाख 14 हजार 73 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 48. 20 टक्के एवढा आहे. इतर देशांच्या तुलनेत हा दर उजवा आहे.

देशात गेल्या 24 तासात 4 हजार 611 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 1 लाख 15 हजार 842 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. तसेच आजपर्यंत 6 हजार 642 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यू दर 2.8 टक्के आहे.

इतर देशांसोबत तुलना करायची झाल्यास अमेरिकेत 19 लाख रुग्ण असून 1 लाख 11 हजारापेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत, ब्राझीलमध्ये 6 लाख 40 हजारहून अधिक रुग्ण असून 35 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे, ब्रिटनमध्ये 2 लाख 84 हजारांहून अधिक रुग्ण असून 40 हजार मृत्यू झाले आहेत, तर हिंदुस्थानपेक्षा कमी रुग्ण असलेल्या इटलीमध्ये 2 लाख 34 हजार रुग्ण असून तब्बल 33 हजार लोकांनी जीव गमावला आहे, फ्रांस मध्ये 1 लाख 53 हजार रुग्ण असून 29 हजार लोकांनी जीव गमावला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या