हिंदुस्थानात कोरोना लसींचे साइड इफेक्ट नाहीत, 40 हजार नागरिकांच्या सर्वेक्षणातून माहिती उघड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाविरोधातील लढाईत सध्या देशभरात जास्तीत जास्त लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. देशभरात आतापर्यंत झालेल्या या लसीकरण मोहिमेत नागरिकांना कोणतेही साइड इफेक्ट जाणवलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. लसीकरणासंदर्भातील करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती उघड झाली आहे. या सर्वेक्षणानुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतलेल्या 70 टक्के आणि कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या 64 टक्के नागरिकांना कोणतेही साइड इफेक्ट झालेले नाहीत तर काहींना सौम्य प्रकारचे साइड इफेक्ट जाणवल्याची माहिती प्रकाशात आली आहे. या सर्वेक्षणात देशभरातील 381 जिह्यांतील एपूण 40 हजार जणांचा समावेश होता. यात 62 टक्के पुरुष तर 38 टक्के महिलांचा समावेश होता.

कोरोनाविरोधात सुरू असलेल्या लढाईला बळ देण्यासाठी देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला शुभारंभ करण्यात आला होता. या लसीकरण मोहिमेत प्रथम सिरम इन्स्टिटय़ूची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसींचा वापर करण्यात आला. त्यानुसार आतापर्यंत झालेल्या लसीकरण मोहिमेसंदर्भातील केलेल्या सर्वेक्षणात लसीकरण झालेल्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट जाणवलेले नाहीत. तर काहींनी सौम्य प्रकारचे साइड इफेक्ट जाणवले असल्याची तक्रार केली आहे.

काय सांगते सर्वेक्षण
 कोविशिल्ड लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या तब्बल 75 टक्के नागरिकांना कोणतेही साइड इफेक्ट जाणवलेले नाहीत. तर कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस घेतलेल्या 78 टक्के नागरिकांनी साइड इफेक्टची तक्रार केलेली नाही.
 कोविशिल्डचे एक डोस पूर्ण केलेल्या 30 टक्के नागरिकांनी साइड इफेक्ट जाणवल्याचे नमूद केले असून यात 29 टक्के नागरिकांनी ताप आल्याची माहिती दिली आहे. तर 1 टक्के नागरिकांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले.

 तर कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेणाऱया 30 टक्के नागरिकांनी आपल्याला ताप आल्याची तक्रार केली आहे. तर 1 टक्के नागरिकांनी आपल्याला इतर त्रास जाणवल्याचे सांगितले.

 तर कोविशिल्डचे दोन डोस घेतल्यानंतर केवळ 20 टक्के नागरिकांनी ताप आल्याची तक्रार केली आहे. तर 4 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

 कोव्हॅक्सिनचे दोन डोस पूर्ण केलेल्या 17 टक्के नागरिकांनी त्यांना ताप आल्याचे सांगितले असून 2 टक्के नागरिकांना कोरोना तर 3 टक्के नागरिकांची प्रपृती खालावल्याचे सांगितले.