इंग्लंडने दबावात सरस खेळ केला

सामना ऑनलाईन । साऊथम्पटन

इंग्लंड दौर्‍यावर यजमानांना कसोटी मालिकेत चांगली टक्कर दिली असे म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणे योग्य ठरणार नाही. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंनी आता दबावात कामगिरी उंचावण्याची कला शिकायला हवी. इंग्लंडने दबावात आमच्याहून अधिक सरस खेळ केला म्हणून त्यांनी पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी आधीच जिंकली अशी प्रतिक्रिया ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने दिली.

साऊथम्पटन कसोटी गमावल्यानंतर विराट कोहली म्हणाला, खेळपट्टीवर आल्यानंतरच परिस्थितीची जाणीव व्हायला हवी. सामना संपल्यानंतर हे करायला हवे होते अन् ते करायला हवे होते असे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. इंग्लंड दौर्‍यावर आम्ही चांगला खेळ केला, मात्र केवळ चांगला खेळ केला म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेण्यात काय अर्थ! चांगला खेळ केला तर जिंकण्याची कलाही आता आत्मसात करायला हवी. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंमध्ये क्षमता आहे म्हणून आम्ही इंग्लंडच्या तोडीस तोड खेळ करू शकलो, मात्र दबावात कामगिरी उंचावण्यासाठी आता प्रयत्न करायला हवेत.

मोईनचं कौतुक, अश्विनचा बचाव!

‘चौथ्या कसोटीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज मोईन अलीने दोन्ही डावांत 9 फलंदाज बाद करून विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे मोईन अली नक्कीच कौतुकास पात्र आहे. हिंदुस्थानचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विननेही सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने योग्य टप्यावर चेंडू फेकले, मात्र त्याला बळी मिळाले नाहीत. कधी कधी चांगला खेळ करूनही यश मिळत नसते. अश्विनच्या बाबतीतही तेच घडले.’ –  विराट कोहली (कर्णधार, हिंदुस्थान)

…ते हरले, पण कसोटी क्रिकेट जिंकले – रूट

विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका 1-3 फरकाने आधीच गमावली असली तरी प्रत्येक कसोटी ही चुरशीने खेळली गेली. सामन्याच्या प्रत्येक दिवशी पारडे कधी इकडे तर कधी तिकडे झुकलेले बघायला मिळाले. त्यामुळे हिंदुस्थानी संघ मालिकेत हरला असला तरी कसोटी क्रिकेट जिंकले अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार जो रूटने दिली.