IND vs ENG : पडझडीनंतर ध्रुव-कुलदीपने सावरले!

हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यानच्या तिसऱया कसोटी क्रिकेट सामन्यातील दुसरा दिवस खऱया अर्थाने गोलंदाजांनी गाजविला. शनिवारी दिवसभरात रांचीच्या खेळपट्टीवर 10 फलंदाज बाद झाले. इंग्लंडने पहिल्या डावात 352 धावसंख्या उभारली, मात्र प्रत्युत्तरादाखल यजमान हिंदुस्थानची 73 षटकांत 7 बाद 219 अशी अवस्था झाली असून इंग्लंडकडे अजूनही 134 धावांची आघाडी आहे. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा ध्रुव जुरेल 30, तर कुलदीप यादव 17 धावांवर खेळत होते. सुरुवातीच्या 7 बाद 177 अशा पडझडीनंतर याच दोघांनी हिंदुस्थानला खऱया अर्थाने सावरले व 200 धावांचा टप्पा ओलांडून दिला. दरम्यान, इंग्लंडने पहिल्या दिवसाच्या 7 बाद 302 धावसंख्येवर शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र या धावसंख्येत केवळ 51 धावांची भर घालून इंग्लंडचा पहिला डाव 104.5 षटकांत 353 धावांवर संपला. पहिल्या दिवसाचा शतकवीर जो रूट (नाबाद 122) व ओली रॉबिन्सन (58) या दोघांनी सकाळच्या सत्रात हिंदुस्थानी गोलंदाजीचा जोरदार प्रतिकार केला. मात्र त्यानंतर रवींद्र जाडेजाने रॉबिन्सनचा अडसर दूर केल्यानंतर शोएब बशीर व जेम्स अॅण्डरसन यांना भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवले.

जैस्वालची यशस्वी झुंज
कर्णधार रोहित शर्मा केवळ दोन धावांवर तिसऱयाच षटकांत माघारी परतला. त्याला जेम्स अॅण्डरसनने यष्टीमागे बेन पह्क्सकरवी झेलबाद केले. मात्र त्यानंतर दुसरा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (73) आणि आलेल्या शुबमन गिलने (38) दुसऱया विकेटसाठी 82 धावांची भागीदारी केली. फिरकीपटू शोएब बशीरने गिलला पायचीत पकडून ही जोडी पह्डली. त्यानंतर याच बशीरने रजत पाटीदार (17), रवींद्र जाडेजा (12), यशस्वी जैस्वाल (73) व सर्फराज खान (14) ही मधली फळी कापून काढत हिंदुस्थानला बॅकफूटवर ढकलले. यशस्वी जैस्वालने 117 चेंडूंत 73 धावांची खेळी केली. तिसऱया सत्रात तोही बशीरचा बळी ठरला. त्यानंतर डावखुरा फिरकीपटू टॉप हर्टलीने सर्फराज खानसह अश्विनला (1 धावा) बाद करून इंग्लंडला ‘ड्रायव्हर सीट’वर आणले. त्यानंतर जुरेल-कुलदीप जोडीने पुढील 19 षटके खेळून काढली. इंग्लंडकडून शोएब बशीरने चार, टॉम हर्टलीने दोन तर जेम्स अॅण्डरसनने एक गडी बाद केला.