Asian Wrestling Championship – ग्रीको रोमनमध्ये हिंदुस्थानी पदकाची झोळी रिकामी

किर्गिस्तानमध्ये सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील ग्रीको रोमन प्रकारात हिंदुस्थानच्या पदकाची झोळी अखेर रिकामीच राहिली. हिंदुस्थानचा एकमेव आशास्थान असलेला रोहित दहियाही कास्यपदकाच्या लढतीत पराभूत झाला.

हिंदुस्थानी कुस्तीपटू ग्रीकोरोमन प्रकारात निराशा करीत असताना रोहित दहियाने 82 किलो गटातून कास्यपदकाची लढत निश्चित करीत देशवासीयांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, मात्र जागतिक क्रमवारीत 12व्या स्थानी असलेल्या दहियाला कास्यपदकाच्या लढतीत अव्वल मानांकित उझबेकिस्तानच्या मुखम्मदकोडिर रसुलोवने  तांत्रिक गुणाच्या आधारे पराभूत केले. दहियाला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या योशिदा ताईजो याने 7-2 गुण फरकाने हरविले होते, मात्र योशिदा फायनलमध्ये पोहोचल्याने दहियाला कांस्यपदकाच्या लढतीत खेळण्याची संधी मिळाली होती.

हिंदुस्थानच्या परवेश (60 किलो), विनायक सिद्धेश्वर पाटील (67 किलो) व अंकित गुलिया (72 किलो) यांनी सलामीच्या लढतीत हार पत्करावी लागली. त्याआधी सोमवारी अर्जुन हलाकुकाa (55 किलो), उमेश (63 किलो), साजन (77 किलो), अजय (87 किलो) व मेहर सिंह (130 किलो) यांचाही पहिल्याच फेरीत पराभव झाला होता.

महिला गटात हिंदुस्थानी कुस्तीपटूंनी 3 रौप्य व तितक्याच कास्यपदकाची कमाई केली. पुरुषांच्या फ्री स्टाईल प्रकारात हिंदुस्थानच्या उदितला (57 किलो) रौप्यपदक मिळाले. अभिमन्यू (70 किलो) व विकी (97 किलो) यांनी कास्यपदकांची कमाई केली.