
हाँगकाँगविरुद्धच्या एएफसी आशियाई चषक पात्रता फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी हिंदुस्थानी फुटबॉलला पुन्हा एकदा प्रशासकीय वादाचा फटका बसला आहे. कोची येथील जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सराव आणि पत्रकार परिषदेसाठी आलेल्या हिंदुस्थानी संघाचे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील आणि तीन खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला.
जवळपास 10 वर्षांनंतर हिंदुस्थानी संघ कोचीमध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. मात्र, गुरुवारी एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. मुख्य प्रशिक्षक खालिद जमील, खेळाडू आशिक कुरुनियन, सहल अब्दुल समद आणि बिजोय वर्गीस स्टेडियमवर पोहोचले असता ‘ग्रेटर कोचीन डेव्हलपमेंट अथॉरिटी’च्या (जीसीडीए) सुरक्षा रक्षकांनी त्यांना गेटवरच अडवले. स्टेडियमचे भाडे आणि सुरक्षा ठेव भरण्यावरून झालेला हा वाद झाल्याचे कळते.
जीसीडीएने 20 ते 25 लाख रुपये सुरक्षा ठेव आणि 3 लाख रुपये भाड्याची मागणी केली होती. परंतु केरळ फुटबॉल असोसिएशनने पैसे भरण्यासाठी वेळ मागितला होता, जो मान्य न झाल्याने गेटला कुलूप ठोकण्यात आले.
केरळ फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नवास मिरान यांनी यानंतर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. हा एक किरकोळ तांत्रिक मुद्दा होता, जो लवकरच सोडवला जाईल. आशियाई चषक पात्रता सामना ठरल्याप्रमाणेच पार पडेल, असे ते म्हणाले. मात्र, या गोंधळामुळे प्रशिक्षकांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागले आणि शेवटी पत्रकार परिषद रद्द करून त्यांना परतावे लागले.
हिंदुस्थानी फुटबॉलची नाचक्की
दरम्यान, कोचीमध्ये असा प्रकार घडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात केरळ ब्लास्टर्सच्या खेळाडूंनाही अशाच पेमेंट वादातून प्रवेश नाकारण्यात आला होता.


























































