अंदमानात मॉन्सूनचे आगमन…अन् देशात उष्णतेचा पारा चढाच, अनेक राज्यात पारा 46 पार

अंदमानात मॉन्सूनचे आगमन झाले असल्याने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मॉन्सून 30 मे रोजी पर्यंत केरळात येणार असून 10 जूनपर्यंत महाराष्ट्रात दाखल होणार आहे. मात्र, तोपर्यंत राज्यात आणि देशात उकाडा सहन करावा लागणार आहे. काही राज्यांमध्ये उष्णतेचा प्रकोप झाला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानमध्ये तापमानाचा पारा हा 46 अंशाच्या पुढे गेला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा शहर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. या शहराचे तापमान 46.9 अंशांवर नोंदवण्यात आले आहे.

उत्तर प्रदेश, दिल्ली आणि राजस्थानबरोबरच इतर अनेक शहरात तापमानात वाढ झाली आहे. महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशातही तापमानाचा पारा हा 45 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यासह देशात पुढील काही दिवस येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 18 मे ते 21 मेपर्यंत उत्तर प्रदेशात कमाल तापमान 45 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. या काळात उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय. 18 मे ते 21 मे दरम्यान दिल्लीतील तापमान 44 ते 45 अंशांच्या पुढे राहण्याची शक्यता आहे. राजस्थानच्या बारमेरमध्ये तापमानाचा पारा 47 अंशांवर जाऊ शकतो. पटियाला, पंजाबमध्ये तापमान 45 ते 46 अंश राहण्याची शक्यता आहे.