
देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या विकासाची चाके थांबले आहेत. असे असले तरी सायकलचे चाक मात्र वेगाने फिरू लागले आहे. अनलॉक सुरु झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांत देशभरात सायकलीच्या मागणीतही लक्षणीय वाढ झाली आहे. मागणी इतकी वाढली आहे की जुलै अखेरस उत्पादकांनी सुमारे 1 दशलक्ष सायकली बनविल्या आहेत.
देशाच्या मागणीच्या जवळपास 90 टक्के उत्पादन करणार्या लुधियानाने या व्यवसायात 100 टक्के पेक्षा जास्त वाढ नोंदविली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ दुप्पट आहे. येथील ब्रॅण्डिंग सायकल कंपनींना नवीन सायकलची मोठ्या प्रमाणात ऑर्डर प्राप्त होत आहेत. ऑल इंडिया सायकल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सरचिटणीस केबी ठाकूर यांनी सांगितले की, देशात सायकलींचे उत्पादन एप्रिलमध्ये शून्य ते साडे चार लाखांवर आणि त्यानंतर जूनमध्ये साडे आठ लाखांवर गेले आहे. जुलै अखेर हा आकडा 11 लाखांच्या पुढे जाईल, असे त्यांनी सांगितले. हिरो सायकल्सचे सीएमडी पंकज मुंजाळ यांनी सांगितलं की, सायकलची आयात कमी झाल्याने देशांतर्गत बाजाराला याचा फायदा मिळाला आहे.






























































