4 जूनपासून देशात अच्छे दिन… इंडिया आघाडीचं सरकार येत आहे; महाविकास आघाडीचा एल्गार

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. महाविकास आघाडीने आज पत्रकार परिषद घेऊन महाविजयाचा एल्गारच केला. 4 जूनला आपल्या देशातले जुमला पर्व संपत आहे आणि 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणाले होते त्या ‘अच्छे दिना’ची सुरुवात येत्या 4 जूनपासून होईल. कारण इंडिया आघाडीचे सरकार देशामध्ये येत आहे, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

महाविकास आघाडीची ही संयुक्त पत्रकार परिषद आज ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये झाली. त्यात उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मित्रपक्षांचे नेते उपस्थित होते. उद्धव ठाकरे, खरगे आणि पवारांनी यावेळी विविध विषयांवर भाष्य करत मोदी सरकारचा समाचार घेतला. तसेच देशातील हवा पाहिली तर यावेळी इंडिया आघाडीचे सरकार येईल, असे सूतोवाच केले.

या निवडणूक प्रचारात देशातील लोकांच्या जिव्हाळय़ाचे प्रश्न संपूर्ण देशात चर्चिले गेले आहेत. देशात शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे. भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, व्यक्तीला बदनाम करायचे मग पक्षात घ्यायेच आणि त्याचा सन्मान करायचा. महाराष्ट्राला मोदी सरकार बदनाम करीत आहे. लुटत आहे. मुंबई हे देशाचे आर्थिक पेंद्र मोदींना बघवत नाही. लूट करायची आणि सर्व गुजरातला घेऊन जायचे. मुंबई व महाराष्ट्राची ही लूट इंडिया आघाडीचे सरकार थांबवेल आणि महाराष्ट्राचे वैभव परत एकदा होते त्यापेक्षा कित्येक पटीने महाराष्ट्रात परत आणू, असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

भाजप आता संघालाही नष्ट करून टाकेल, उद्धव ठाकरेंचा प्रहार

भाजप आता स्वयंपूर्ण झाला आहे, त्याला संघाची गरज नाही, असे वक्तव्य भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले होते. त्याचा दाखला देत उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाजपवर निशाणा साधला. शिवसेनेला नकली म्हणणारा भारतीय जनता पक्ष उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही नकली म्हणेल. इतकेच काय, संघावर बंदी घालायलाही मागेपुढे पाहणार नाही. भाजपवाले संघालासुद्धा नष्ट करून टाकतील, असे ते म्हणाले. संघाला पुढच्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, पण सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं शंभरावं वर्ष संघाला धोक्याचं ठरेल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. ज्यांनी राजकीय जन्म दिला त्याच संघाला भाजपवाले संपवायला निघालेले आहेत, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी लाज सोडलीय

जगात कुठेच घडले नसेल असे सध्या सुरू आहे. एका घटनाबाह्य सरकार आणि गद्दारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान येताहेत, आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अजूनही आलेला नाही, न्यायालयाने कडक ताशेरे मारले आहेत, तरीदेखील अक्षरशः लाज सोडून प्रधानमंत्री घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन हुकूमशाहीचा प्रचार करताहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राम मंदिराचे काम पूर्ण करू

केंद्रात ‘इंडिया’ आघाडी सरकार आल्यावर काँग्रेसकडून राम मंदिरावर बुलडोझर चालवला जाईल, असा प्रचार सुरू आहे, पण ते होणार नाही. उलट त्यांनी अर्धवट ठेवलेले राम मंदिराचे काम आमचे सरकार आल्यावर पूर्ण करील. मुस्लिम आमच्यासोबत आहे असे मोदी सांगतात मग उत्तर भारतीय व जैन समाजाला तुम्ही काय उत्तर देणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

मोदींना नवाज शरीफांच्या केकची आठवण

महाविकास आघाडीच्या प्रचारसभांमध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले जात आहेत. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पाकिस्तानमधून ट्विट होत असल्याचा आरोप भाजपकडून होत आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मनी वसे ते स्वप्नी दिसे. कारण भाजपच्या मनात पाकिस्तान आहे. मोदींना नवाज शरीफ यांच्या केकची आठवण येतेच. त्या केकची चव न्यारीच असावी म्हणून सातत्याने त्यांना पाकिस्तान आठवत आहे. एखादे मूल भुकेने कळवळायला लागले तर त्याला भुताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही. कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते. आतापर्यंत मोदी व भाजपने हेच केले.

पुलवामा हल्ला निवडणुका जिंकण्यासाठी?

जेव्हा देशाने भूक, नोकरीसाठी रोजगार, सुरक्षेसाठी आक्रोश केला तेव्हा पाकिस्तानची भीती दाखवली. गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्यावर जम्मू-कश्मीरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी भाजपचे जे भांडे पह्डले आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाही आणि सत्यपाल मलिक यांची माहिती व आरोप फार गंभीर आहेत. केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का, असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

चीनच्या घुसखोरीवर गप्प का?

चीनची घुसखोरी सुरू आहे. लेह-लडाखमध्ये चीन घुसतोय. तिथे सोनम वांगचूक उपोषणाला बसले आहेत. त्यांच्याकडे मोदी-शहा गेले नाहीत. अरुणाचलमध्ये चीन घुसलेला आहे. चीनने आपल्या गावांची नावे बदलली आहेत, पण तरीही हे निर्लज्जपणाने हे म्हणतात नाव बदलले तरी काय झाले. यांना कशाचीच काही पडलेली नाही. फक्त तोडा, पह्डा आणि राज्य करा यावरच त्यांचा भर आहे.

मोदी ब्रह्मदेव नाहीत

‘इंडिया’ आघाडीत पंतप्रधान पदाच्या चेहऱयावर काही सहमती झाली आहे का? आणि भाजप म्हणते की इंडिया आघाडीकडे पंतप्रधानपदासाठी चेहरा नाही या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजप काहीही म्हणू देत, कारण भाजप किंवा नरेंद्र मोदी म्हणजे कोणी ब्रह्मदेव नाही. इंडिया आघाडी ही देशातील लोकशाही व स्वातंत्र्य टिकवण्यासाठी केलेली आहे. आमच्या इंडिया आघाडीकडे अनेक चेहरे आहेत. एका वर्षाला एक पंतप्रधान करू शकतो असे पंतप्रधान म्हणतात. म्हणजे मोदींनी हे मानले आहे की त्यांचे सरकार देशात येणार नाही. आमच्याकडे चेहरा कोण आहे हा प्रश्नच येत नाही. पण भाजपकडेच तो प्रश्न आहे. कारण त्यांच्याकडे एकच चेहरा आहे आणि तोही चेहरा चालत नाही. मोदी म्हणतात त्याप्रमाणे एकच चेहरा किती वेळा लाँच करणार, प्रत्येक वेळेला निवडणूक आल्यावर हे बोहल्यावर चढतात. असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे देशद्रोही

आपण आपल्या भाषणात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो असा उल्लेख करीत फक्त देशभक्त असा उल्लेख करतात, असा आरोप भाजपकडून होत असल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, जे लोक देशभक्त शब्दावर आक्षेप घेतात ते हिंदू नसतील किंवा देशभक्त नसतील. कारण हिंदू देशभक्त नाहीत हा शोध कोणी लावला? मी देशभक्त शब्द वापरल्यावर आक्षेप घेतात ते देशद्रोही आहेत. आणि हिंदू असतील असे मला वाटत नाही. कारण या देशातील सर्व हिंदू हे देशभक्तच आहेत आणि देशभक्तांमध्ये हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीखही आहेत. जे लोक शेतकऱयांच्या आंदोलनाला नक्षलवादी म्हणतात, देशद्रोही म्हणतात आणि संघाचे कार्यवाह होसबळे हे शेतकऱयांच्या आंदोलनाला अराजकता मानतात ते देशभक्त आहेत असे मला वाटत नाही. माझ्या देशभक्त शब्दाला आक्षेप घेणारे देशद्रोही आहेत.

बोटांना आधीच शाई लावून लोकांना मतदानापासून वंचित ठेवले जातेय

निवडणुकीत भाजप आणि मिंध्यांकडून मोठय़ा प्रमाणावर पैसे वाटले जात असल्याच्या तक्रारी आहेत. ज्या भागांमध्ये भाजपला कमी मतदान होण्याची शक्यता आहे तेथील लोकांच्या बोटांना आधीच शाई लावून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याच्याही तक्रारी आहेत. ही शाई बाहेर आलीच कशी? असा सवाल करत याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सतर्क राहून असा प्रकार आढळला तर संबंधिताला पोलिसांच्या ताब्यात द्या, असे आवाहनही त्यांनी केले.

घटनाबाह्य सरकारचे मोदींकडून समर्थन – खरगे

यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, महाराष्ट्रातील सध्याचे हे घटनाबाह्य सरकार धोका देऊन स्थापन झाले आहे. याचे समर्थन स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत. महाराष्ट्रात त्यांच्या खूप प्रचारसभा होत आहेत. ते कुठेही गेले तरी लोकांमध्ये धर्माच्या आधारावर फूट निर्माण करण्याचे काम करीत आहेत. नेहमी समाजाला तोडण्याची गोष्ट करतात. ते देशापुढे चुकीचा विचार नेऊन लोकांना भडकवण्याचे काम करीत आहेत. आतापर्यंत देशातील एकाही पंतप्रधानाने लोकांना भडकवण्याचे काम केले नाही. मी 53 वर्षांपासून राजकारणात आहे, पण मी असे पंतप्रधान पाहिले नव्हते. मोदी जे सांगतात तेच घडत आहे. पण आता निवडणुकीत मोदी सांगतील तसे होणार नाही. ही जनतेची लढाई स्वतः जनता मोदींच्या विरोधात लढत आहे. यावेळेला जनतेचा विजय होईल आणि मोंदीच्या कारनाम्यांवर लोक नाराज आहेत.

मोदींची चिथावणीखोर भाषणे

काँग्रेस राम मंदिरावर बुलडोझर फिरवणार या भाजपच्या प्रचाराच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना खरगे म्हणाले की, भाजपचे सरकारच बुलडोझर आहे. आम्ही आतापर्यंत कधीही आणि कुठेही बुलडोझर फिरवलेला नाही. राम मंदिरावरून लोकांमध्ये भ्रम निर्माण करीत आहेत. लोकांमध्ये रोष निर्माण करून चिथावणी देण्याचे प्रकार सुरू आहेत. असे खरगे म्हणाले.

या पत्रकार परिषदेला शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे, नसीम खान, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, माजी खासदार हुसेन दलवाई, अतुल लोंढे, सचिन सावंत, चरणसिंग सप्रा व अन्य उपस्थित होते.

मोदींनी धार्मिक दरी वाढवली – शरद पवार

राम मंदिराच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, या देशात हिंदू, मुस्लिम, शीख असोत त्यांचा सन्मान करणे आमचे कर्तव्य आहे. निवडणुका झाल्यावर राहुल गांधी पुन्हा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात विधान करू लागतील असा भाजप आरोप करीत असल्याच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, निवडणुकीच्या मुद्दय़ांमध्ये वीर सावरकर यांचा मुद्दाच नाही किंवा राहुल गांधी यांनी त्यासंदर्भात कोणतेही भाष्य केलेले नाही. कारण नसताना चिथावणी दिल्यासारखे काम मोदी करीत आहेत. त्यांचे भाषण म्हणजे धर्मांध दरी वाढेल कशी वक्तव्ये केलेली आहेत. आज सामाजिक ऐक्य देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. देशाच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी तारतम्य दाखवण्याची गरज आहे. हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत की, जे यासंदर्भातील तारतम्य दाखवत नाहीत. हे या देशाचे दुर्दैव आहे. मोदी सामाजिक, धार्मिक ऐक्याला स्थान देत नाहीत, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी केली.

महाराष्ट्रात 46 जागा जिंकणार – खरगे

संवैधानिक संस्थांचा दुरुपयोग करून, धमक्या देऊन, लालूच दाखवून विरोधी पक्ष पह्डण्याचे काम मोदी सरकारकडून केले जात आहे, मोदी लोकशाहीच्या गप्पा मारतात, पण लोकशाहीने चालत नाहीत. महाराष्ट्रात महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षे झाल्या नाहीत. हीच मोदींची लोकशाही आहे का असा सवाल करतानाच, महाराष्ट्रातील 48 पैकी कमीत कमी 46 जागा महाविकास आघाडीला मिळतील अशी हवा आहे आणि हे जनताच बोलत आहे, असे खरगे म्हणाले