पुढील पाच दिवस देशात उष्णतेचा कहर, हवामान विभागाचा इशारा

देशात सध्या उन्हाळा प्रचंड तापदायक झाला आहे. तापमानाचा पारा भलताच वर गेल्याने माणसांची काय निसर्गाचीही काहिली होताना दिसत आहे. दुपारी रस्ते सामसुम होताना दिसत आहेत. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी भीषण उष्णतेविषयी इशारा जारी केला आहे.

पुढील पाच दिवस देशातील विविध भागांमध्ये तापमानाचा पारा असह्य होणार असून आर्द्रतेतही प्रचंड वाढ होणार आहे. यात पंजाब, हरयाणा, चंदिगढ, दिल्ली या राज्यांसह उत्तर प्रदेशचे काही भाग समाविष्ट आहेत. त्याचसोबत हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही उष्णतेची लाट येणार आहे. त्याची सुरुवात 19 मे पासून झाली आहे.

पश्चिम राजस्थान भागात 21 ते 23 मे आणि पूर्व राजस्थान भागात 23 आणि 23 मे रोजी उष्णतेची लाट येणार आहे. उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि पूर्व भागात 19 ते 21 दरम्यान उष्णतेच्या लाटा येतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, केरळ या राज्यासाठी मात्र 19 ते 22 मे दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.