यंदा 101 टक्के पाऊस पडणार, हवामान खात्याची नवीन आनंदवार्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाला यंदा लागोपाठच्या दोन चक्रीवादळांचा मोठा फटका बसला असताना वरुणराजा मात्र चांगली कृपा करणार आहे. यंदा देशभरात सरासरीच्या 101 टक्के पाऊस पडेल, असा सुधारित अंदाज हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. उत्तर-दक्षिण हिंदुस्थानात सरासरीइतका, तर मध्य हिंदुस्थानात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचे भाकीत हवामान खात्याने केले आहे.

‘आयएमडी’चे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी मंगळवारी मान्सूनच्या आगमनासंबंधी दुसऱया टप्प्यातील अंदाज वर्तवला. देशात यंदा पावसाची समाधानकारक हजेरी लागणार आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान बरसात करणाऱया मान्सूनची सरासरी पातळी 96 ते 104 टक्क्यांच्या आसपास असेल, अशी शक्यता महापात्र यांनी वर्तवली आहे. प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होत असल्याने त्याचा सकारात्मक परिणाम मान्सूनवर दिसणार आहे. मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असे हवामान खात्याच्या सुधारित अंदाजात म्हटले आहे. याआधी एप्रिलमध्ये पहिला अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यावेळी 98 टक्के पावसाचे भाकीत करण्यात आले होते. आता सुधारित अंदाजात पावसाच्या सरासरीपेक्षा अधिक हजेरीची आनंदवार्ता देण्यात आली आहे. मान्सूनच्या उत्तरार्धात चांगला पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

n सन 1961 ते 2010 दरम्यान मान्सूनचे सरासरी प्रमाण 88 सेंटीमीटर राहिले आहे. सरासरीच्या 96 ते 104 टक्क्यांपर्यंतचा पाऊस सामान्य स्वरूपाचा अर्थात समाधानकारक मानला जातो. त्यामुळे यंदा पावसाची सरासरीच्या 101 टक्के बरसात होणार असल्यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळणार आहे.