
हिंदुस्थानी हवाई दलात लवकरच आणखी पाच राफेल या लढाऊ विमानांचा समावेश होणार आहे. फ्रान्सकडून ही विमाने हिंदुस्थानाला सोपविण्यात आली असून सध्या ही पाचही विमाने फ्रान्समध्येच असल्याची माहिती पुढे आली आहे.
ऑक्टोबरमध्ये ही पाचही विमाने हिंदुस्थानात येणार असून पश्चिम बंगाल येथील कलईकुंडा एअरफोर्स स्टेशनवर ही पाचही विमाने तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. चीनच्या पूर्वेकडील सीमारेषेवर ही पाचही विमाने लक्ष ठेवणार आहेत.
हिंदुस्थानने राफेलमध्ये केले बदल
चीनच्या सीमारेषेवरील तापमानाची दखल घेत हिंदुस्थानने राफेलमध्ये काही बदल केल्याची माहिती पुढे आली आहे. यानुसार कमी तापमानातदेखील विमान सहज सुरू करता येऊ शकणार आहे. दरम्यान, पहिल्या तुकडय़ांतील पाचही विमानांनी 250 हून अधिक तास उड्डाण आणि फिल्ड फायरिंग पूर्ण केल्याचे कळते.
चीनच्या जे-20 पेक्षा उत्कृष्ट
हिंदुस्थानी हवाई दलाकडे असलेले राफेल हे चीनच्या लढाई विमानांच्या तुलनेत उत्कृष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. चीनकडे ‘जे-20’ तर पाकिस्तानकडे जेएफ-17 ही लढाऊ विमाने आहेत. या दोन्ही विमानांच्या तुलनेत राफेल हे उत्कृष्ट विमान मानले जाते. चीनचे ‘जे-20’ हे एक फायटर विमान आहे. पण राफेल अनेक कामांसाठी वापरता येऊ शकणार आहे.





















































