पाकड्यांची ‘नापाक’ हरकत, एफ-16 विमानांनी रोखला ‘स्पाईस जेट’चा मार्ग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरातील 370 कलम काढून टाकल्यावर पाकिस्तानी सरकारच नव्हे, तर त्यांचे लष्करही सैरभैर झाले आहे. गेल्याच महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानी हवाई दलाच्या अनेक एफ-16 लढाऊ विमानांनी स्पाईस जेट या हिंदुस्थानी कंपनीच्या विमानाला घेरून आकाशात सुमारे तासभर रोखल्याची घटना उघडकीस आली आहे. सुमारे 120 प्रवासी घेऊन काबूलला निघालेल्या या विमानाची हवेतच झाडाझडती घेण्याच्या पाकडय़ांच्या कृतीने वैमानिकांसह प्रवासी पार हादरले होते.

23 सप्टेंबरला स्पाईस जेटचे एक विमान 120 प्रवासी घेऊन दिल्लीहून अफगाणिस्तानची राजधानी काबूलला निघाले होते. एसजी-21 क्रमांकाच्या उड्डाणाचे हे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत येताच त्याला पाकिस्तानी हवाई दलाच्या अनेक एफ-16 लढाऊ विमानांनी घेरले. सुमारे तासभर हवेत हे घेरावनाटय़ सुरू होते. विशेष म्हणजे या काळात पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र अन्य देशांच्या प्रवासी विमानांसाठी बंद ठेवलेले नव्हते.

120 प्रवाशांचा जीव लागला होता टांगणीला

पाकच्या लढाऊ विमानातील कॅप्टनने जेटच्या पायलटला विमान कमी उंचीवर का आणले, असा सवाल करीत विमानाचा पूर्ण तपशील द्यायला बजावले, मात्र या नाटय़ादरम्यान विमानातील 120 प्रवाशांचा जीव मात्र टांगणीला लागला होता. कारण पाकिस्तानी हवाई दलाच्या हवाई चौकशीत जेटच्या पायलटची छोटीशीही चूक शेकडो प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण करू शकली असती. अखेर तासाभराने पाकिस्तानी लढाऊ विमानांनी हिंदुस्थानी प्रवासी विमानाला पुढे काबूलला जाण्याची परवानगी दिली आणि वैमानिकांसह प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

  • 23 सप्टेंबरला पाकिस्तानी आकाशात घडलेल्या या घेरावनाटय़ात पाकिस्तानची काही एफ-16 विमाने जेटच्या इतकी जवळ आली होती की, पाकिस्तानी हवाई दलाच्या अधिकाऱयांना जेटमधील प्रवासी स्पष्टपणे पाहू शकत होते आणि पाकिस्तानी अधिकारीही या विमानातील प्रवाशांना पाहत होते. या नाटय़ादरम्यान जेटच्या वैमानिकाने आपल्या विमानाचा आणि विमानातील प्रवाशांचा तपशील पाकिस्तानी हवाई दलाच्या अधिकाऱयांना दिला होता.