
जम्मू कश्मीरच्या सीमेजवळील भागात तणाव कायम आहे. नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) ड्रोनसदृश उडणारी वस्तू दिसल्याने सैन्य दलाचे जवान सतर्क झाले आहेत. मात्र, उडणारी वस्तू ड्रोन होती किंवा इतर काही होते याबाबत शोध घेण्यात येत आहे. हेरगिरीच्या हेतूने ड्रोनसदृश वस्तू एलओसीजवळ पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
एलओसीजवळ तणाव वाढला असताना आणि दररोज पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना घडत असताना ही ड्रोनसदृश वस्तू दिसली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक पुरापतींना जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. तसेच दहशतवाद्यांकडून घुसखोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा दल सतर्क आहेत. त्यातच आता ड्रोनसदृश्य वस्तू दिसल्याने जवान अधिक सतर्क झाले आहेत.
पाकिस्तानकडून शनिवारीही शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. रोजौरीतील नौशेरामध्ये शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबाराला सुरुवात केली होती. यावेळी मोर्टारही डागण्यात आले. जानेवारीपासून आतापर्यंत पाकिस्तानकडून 3,200 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यात 30 नागरिकांचा मृत्यू तर 110 जण जखमी झाले.
























































