
सामना ऑनलाईन। श्रीनगर
शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या पाकड्यांना हिंदुस्थानी जवानांनी सडेतोड उत्तर दिले आहे. अखनूर सेक्टरला लागून असलेल्या सीमाभागातील १० पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त केले आहेत. एका हिंदी वृत्तवाहिनीने याबद्दल माहिती दिली आहे. पाकिस्तानी बंकर्स उद्धवस्त होतानाचे तीन व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद झाल्याचेही या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. दरम्यान, हिंदुस्थानच्या या कारवाईमुळे हादरलेल्या पाकड्यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थानी अधिकाऱ्यांबरोबर शांतता टिकवण्यासाठी चर्चेची तयारी दर्शवली आहे.
यातील पहिल्या व्हिडिओमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकू येतो. थोड्याच वेळात सीमेवरील एक चौकी उद्ध्वस्त झाल्याचे दिसते. त्यानंतर दुसऱ्या व्हिडीओत अचानक पाकिस्तानी भागात एका पाठोपाठ एक असा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकू येतो. धुराचे लोटच्या लोट वर आकाशात जात असताना दिसतात. त्याचवेळी व्हिडिओत कोणीतरी ‘गुड शॉट’ असं म्हटल्याचं ऐकू येतं. तिसऱ्या व्हिडिओत पाकिस्तानचे बंकर उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट दिसतात.
पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यावर अनेकवेळा हिंदुस्थानने पाकिस्तानला सुनावलेही आहे. पण पाकिस्तानचे कुरापती करणे सुरूच आहे. रमजानच्या पवित्र महिना सुरू असल्याने या दिवसात गोळीबार न करण्याची घोषणा हिंदुस्थानने केली होती. मात्र, तरीही पाकिस्तानी सैनिकांकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. शनिवारी पाकिस्तानच्या गोळीबारात हिंदुस्थानचे दोन जवान शहीद झाले होते. यामुळे पाकड्यांचे १० बंकर नेस्तनाबूत करत जवानांनी त्यांना जशास तसे उत्तर दिले आहे. यामुळे हादरलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी हिंदुस्थानी अधिकाऱ्यांबरोबर शांतीपूर्व बोलणी करण्याची तयारी दाखवली आहे.
























































