
पाकिस्तानच्या रेल्वे मंत्र्यांनी हिंदुस्थानला धमकी दिली आहे. रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी म्हटलंय की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून त्यांचा पल्ला आसामपर्यंत आहे. रशीद यांनी असाही दावा केला आहे की या अणुहल्ल्यामुळे मुसलमानांना कोणतेही नुकसान होणार नाही. रशीद यांनी म्हटलंय की हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं तर ते पारंपरीक पद्धतीने होणार नाही, डायरेक्ट अणुबॉम्बनेच होईल. तिथल्या एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केलं आहे.
रशीद यांनी या मुलाखतीमध्ये म्हटले की चीन हा अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि इंग्लंडविरोधात उभा आहे. चीनने नेपाळ, श्रीलंका, इराण आणि रशियासोबत नवा गट तयार केला आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानने चीनसोबत उभे राहिला पाहीजे. शेख रशीद हे त्यांच्या बाष्कळ आणि बेताल विधानांसाठी प्रसिद्ध असून ते सातत्याने नवनवीन वाद निर्माण करत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी म्हटले होते की पाकिस्तानकडे सव्वाशे आणि अडीचशे ग्रॅमचे अणुबॉम्ब आहेत. याशिवाय आपल्याकडे पाव किलोचेही अणुबॉम्ब असून हे बॉम्ब विशिष्ट लक्ष्यावर अचूकपणे आदळू शकतात असे ते म्हणालेत. रशीद यांनी प्रभू श्रीरामाच्या मंदिर निर्माणाबाबतही बेताल विधाने केली होती. हिंदुस्थान आता धर्मनिरपेक्ष राहिला नसून तो एका धर्माचा देश बनल्याचं ते म्हणालेत.
जम्मू कश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या विरोधात पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी काही महिन्यांपूर्वी जाहीर भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांना माईकमधून वीजेच्या प्रवाहाचा करंट लागला होता. या प्रसंगामुळे घाबरलेल्या रशीद यांनी यामागे हिंदुस्थानचा हात असल्याचं हास्यास्पद वक्तव्य केलं होतं.
जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने हिंदुस्थान विरोधात नागरिकांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. मात्र याच जनतेच्या आंदोलनात पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी मोदींविरोधात बोलण्यास सुरुवात करताच माईकमधून वीजेचा प्रवाह वाहू लागला आणि त्यांना करंट लागला होता. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रशीदही घाबरले होते. पण मोदी आमचे हे आंदोलन थांबवू शकत नाही असे म्हणत त्यांनी सारवासारव केली. शेख यांच्या या फजितीचा व्हिडीओ व्हायरल झाला होता आणि नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच हुर्यो उडवली होती. ही बातमी हिंदुस्थानची प्रसारमाध्यमं वारंवार दाखवत होती. यामुळे बिथरलेल्या रशीद यांनी यामागे हिंदुस्थानचा हात असून हिंदुस्थानला मला संपवायचं आहे. मी हिंदुस्थानला सांगू इच्छितो की, मी इतक्या लवकर मरणार नाही आणि जोवर मी जिवंत आहे, तोवर मी तुम्हाला सोडणार नाही, असं वक्तव्य केलं आहे.

























































