
हिंदुस्थान-पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आगामी आयसीसीच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये एकमेकांना भिडणार आहेत. आयसीसीकडून शुक्रवारी या स्पर्धेतील ‘सुपर-12’ व ‘पहिली फेरी’ (पात्रता) या दोन्हींची गटवारी जाहीर करण्यात आली. ‘गट दोन’मध्ये हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन देशांचा समावेश असून याच गटात न्यूझीलंड व अफगाणिस्तान हे दोन देशही आहेत. तसेच पहिल्या फेरीमधून पात्र ठरणारे दोन संघही या गटात असणार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानाची समजली जाणारी ही स्पर्धा 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ओमान व यूएई या देशांमध्ये खेळवण्यात येणार आहे.
‘गट एक’मध्ये तगडे संघ
हिंदुस्थान, पाकिस्तान ज्या गटात आहे त्या गटात न्यूझीलंड हा एकमेव संघ बलाढय़ वाटतो. अफगाणिस्तानचा संघ तुलनेने कमकुवत आहे. तसेच पहिल्या फेरीमधून कोणते संघ या गटात येतील हे आत्ताच सांगता येणार नाही. पण ‘गट एक’मध्ये चारही संघ तगडे आहेत. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज या चार देशांचा यात समावेश आहे. तसेच पहिल्या फेरीमधून दोन संघांचीही या गटात एण्ट्री होणार आहे.
श्रीलंका, बांगलादेश पहिल्या फेरीत लढणार
1996 व 2014 सालातील वर्ल्ड चॅम्पियन श्रीलंका व गेल्या काही वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रगती करणारा बांगलादेशचा संघ पहिल्या फेरीपासून या स्पर्धेची सुरुवात करतील. आयसीसीकडून 20 मार्च 2021 सालापर्यंतच्या रँकिंगच्या सहाय्याने गटवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या फेरीत दोन गटांमध्ये प्रत्येकी चार देशांचा समावेश असेल. या आठ देशांमधून चार संघ ‘सुपर-12’ या फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
पारंपरिक प्रतिस्पर्धी याच स्पर्धेत पुन्हा आमने-सामने येऊ शकतील
आयसीसी व आयोजक बीसीसीआय यांनी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची गटवारी काढताना आर्थिक फायदाही डोळ्यांसमोर ठेवला. या दोन देशांमधील लढतींवर जगभरातील क्रिकेटप्रेमींच्या नजरा खिळलेल्या असतात. त्यामुळे जाहिराती, स्पॉन्सर्स यांचीही पावले या लढतीकडे वळू लागतात. आयसीसी व बीसीसीआयने कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हिंदुस्थान व पाकिस्तान या दोन देशांना एकाच गटात समाविष्ट केले आहे. जेणेकरून पुढे जाऊन बाद फेरीतही हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील आणि बक्कळ पैसा मिळवून देतील.
आयसीसी टी-20 वर्ल्ड कप सुपर 12 फेरीतील गटवारी
गट एक
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
दक्षिण आफ्रिका
वेस्ट इंडीज
अ गटातील विजेता
ब गटातील उपविजेता
गट दोन
हिंदुस्थान
पाकिस्तान
न्यूझीलंड
अफगाणिस्तान
अ गटातील उपविजेता
ब गटातील विजेता
पहिल्या फेरीतील गटवारी
गट ए
श्रीलंका
आयर्लंड
नेदरलॅण्ड
नामिबीया
गट बी
बांगलादेश
स्कॉटलंड
पप्पूआ न्यू गिनीया
ओमान




























































