Breaking – युग संपले! स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी संगीत विश्वातला एक अढळ ध्रुवतारा, हिंदुस्थानच्या स्वरसम्राज्ञी, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. सकाळी 8.12 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लतादीदींची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.

लता दीदींच्या पश्चात आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना खडीकर अशा तीन बहिणी तर हृदयनाथ मंगेशकर हे बंधू असा परिवार आहे. लतादीदींच्या निधनामुळे मंगेशकर कुटुंबीयांसह अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. लता दीदींच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

लता मंगेशकर (ज्येष्ठ गायिका)

गानसम्राज्ञी लता मंगेशकर नुकत्याच कोरोनातून बऱ्या झाल्या होत्या. लतादीदींना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांना कोरोनासोबतच न्युमोनियाचीही लागण झाली होती. या दोन्हीवर त्यांनी मात केली होती. कोरोनातून बरे झाल्यानंतर लतादीदींना अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना काही दिवस आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते.

हिंदुस्थानच्या स्वरसम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता दीदींनी खूप कमी वयात संगीत क्षेत्रात नाव कमवायला सुरुवात केली. वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या घरात 28 सप्टेंबर 1929 साली त्यांचा जन्म झाला. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायन क्षेत्रात पदार्पण केलं. जगात सर्वाधिक वेळा पार्श्वगायन करणारी गायिका म्हणून त्यांच्या नावे विक्रम नोंदवलेला आहे. हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलं आहे. तर आनंदघन या नावाने संगीत देखील दिलं आहे.

लता दीदींना आतपर्यंत भारतरत्न, पद्मभूषण, पद्मविभूषण असे मानाचे नागरी सन्मान तसंच दादासाहेब फाळके पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्कार यांच्यासह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत.