
जागतिक स्तरावर एखाद्या देशाची ताकद मापण्यासाठी पार्सपोर्ट इंडेक्स हा महत्त्वाचा मापदंड आहे. मजबूत पासपोर्ट असेल तर त्या देशाच्या नागरिकांना व्हिसाशिवाय अनेक देशांमध्ये मुक्तपणे फिरता येते. या संदर्भात हेन्ली पासपोर्ट इंडेक्स नुकताच जाहीर झाला असून या क्रमवारीत हिंदुस्थानची घसरण झाली आहे.
हेन्ली पासपोर्ट इंडेक्सने आपला नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर आणि स्पेन या देशांचा पासपोर्ट सर्वात मजबूत आहे. कारण या देशातील नागरिकांना 227 पैकी 194 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश मिळतो. त्यानंतर दक्षिण कोरिया, स्विडन आणि फिनलँडचा नंबर लागला आहे. या देशातील नागरिक 193 देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरू शकतात. तर ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड आणि नेदरलँडचे नागरिक 192 देशांमध्ये व्हिसाशिवाय ये-जा करू शकतात.
हिंदुस्थानच्या पासपोर्टची या यादीमध्ये घसरण झाली आहे. गेल्यावर्षी 84व्या स्थानावर असणारा हिंदुस्थान 85व्या स्थानावर पोहोचला आहे. हिंदुस्थानी नागरिकांना 62 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे. हिंदुस्थानचा शेजारील देश पाकिस्तान 106 व्या, तर बांगलादेश 102व्या स्थानावर आहे. हिंदुस्थानच्या तुलनेत मालदीवचा पासपोर्ट मजबूत आहे. मालदीव 58व्या स्थानावर असून या देशातील लोकं 96 देशांमध्ये व्हिसाशिवाय जाऊ शकतात.
दुसरीकडे चीनला दोन स्थानाचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षी 66व्या स्थानावर असणारा चीन आता 64 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर अमेरिकेलाही एका स्थानाचा फायदा झाला असून ते 7व्या वरून 6व्या स्थानावर आले आहे. अमेरिकेचे नागरिक 188 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवेश करू शकतात.
दरम्यान, हेन्ली पासपोर्ट इंडेक्स हा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक प्राधिकरणच्या खास माहिताच्या आधारे बनवला जातो. यात 199 देशांचा पासपोर्ट आणि 2257 विविध स्थळांचा समावेश आहे. या इंडेक्सनुसार 2006मध्ये लोकं सरासरी 58 देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवास करू शकत होते, मात्र ही संख्या गेल्या 18 वर्षांमध्ये 111 वर पोहोचली आहे.
टॉप 10 देश
– फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन (194 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– फिनलँड, दक्षिण कोरिया, स्विडन (193 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– ऑस्ट्रिया, डेन्मार्क, आयर्लंड, नेदरलँड (192 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– बेल्झियम, लक्झेंबर्ग, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंग्डम (191 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– ग्रिस, माल्ता, स्वित्झर्लंड (190 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– ऑस्ट्रेलिया, द चेक प्रजासत्ताक, न्यूझीलंड, पोलंड (189 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– यूएस, कॅनडा, हंगेरी (188 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– एस्टोनिया, लिथुएनिया (187 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– लात्व्हिया, स्लोवाकिया, स्लोव्हेनिया (186 देशात व्हिसामुक्त प्रवेश)
– आईसलंड (185 देशात व्हिसामुक्त प्रवेश)

























































