
रशियन बनावटीच्या स्पुटनिक-व्ही या लसीचे ऑगस्टपासून हिंदुस्थानात उत्पादन सुरू होणार आहे. तसेच मेअखेर स्पुटनिक लसीच्या 30 लाख मात्रा देशाला उपलब्ध होतील, असे हिंदुस्थानचे रशियातील राजदूत डी. बी. व्यंकटेश वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.
स्पुटनिक-व्ही लस हिंदुस्थानात आयात करण्यासाठी डॉ. रेड्डीज लॅबेरेटरीने रशियासोबत करार केला असून त्याची पहिली खेप 1 मे रोजी आली आहे. त्याला केंद्रीय औषध विभागाने परवानगी दिली आहे. या लसीची सध्या जीएसटीसह 995 रुपये किंमत आहे. या लसीचे हिंदुस्थानात उत्पादन सुरू झाल्यानंतर किंमत कमी होईल असे याआधीच रेड्डीज लॅबोरेटरीने स्पष्ट केले आहे. दरम्यान हिंदुस्थानात सध्या कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक-व्ही या तीन लसींना मंजुरी मिळाली आहे.






















































