
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
21 व्या शतकात हिंदुस्थान हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून ओळखला जाईल असे यूएनने केलेले भाकीत आज खरे ठरण्याची शक्यता आहे. कारण नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हिंदुस्थानमध्ये तब्बल 69,944 बालके जन्माला येणार आहेत. हा आकडा जगभरात जन्मलेल्या बालकांच्या 18 टक्के एवढा आहे. यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान चीनलाही मागे टाकण्याची शक्यता आहे.
यूएनने नुकतेच जगभरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्मदरावर सर्वेक्षण केले होते. त्यानुसार नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी चीन व नायजेरियाला मागे टाकत सर्वाधिक 69,944 बालके हिंदुस्थानमध्ये जन्माला येतील. अशी शक्यता वर्तवली होती. नववर्षारंभी चीनमध्ये 44,940 तर नायजेरियामध्ये 25,6 85 बालके जन्माला येणे अपेक्षित असल्याचे यूएनने म्हटले होते.
दरम्यान, सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा चौथा क्रमांक असून येथे नववर्षारंभी 15,112 बालके जन्माला आली आहेत. तर इंडोनेशियामध्ये 13,256 बालकांचा जन्म झाला आहे. अमेरिकेत हा आकडा 1,086 एवढा असून बांग्लादेशमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ८,४२८ बालके जन्मास आल्याचे यूएनने म्हटले आहे.
सध्या हिंदु्स्थानची लोकसंख्या 1.3 बिलियन असून जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत चीननंतर हिंदु्स्थान दुसऱ्या स्थानावर आहे. मात्र 2024 पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीत हिंदुस्थान चीनला मागे टाकेल असेही य़ूएनने म्हटले आहे.

























































