इस्रोची अंतराळ क्रांती, हिंदुस्थान स्पेस स्टेशन उभारणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानने अवकाश संशोधनात मोठे पाऊल उचलले असून, स्वतःचे अवकाश स्थानक अर्थात ‘स्पेस स्टेशन’ स्थापित करण्याची तयारी सुरू केली आहे. या ऐतिहासिक कर्तबगारीची माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवन यांनी दिली. गगनयान मिशनचा विस्तार करण्यात येणार असून, दुसऱया टप्प्यात स्पेस स्टेशन विकसित करण्यात येईल, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

हिंदुस्थानने अवकाशात मानव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. ‘गगनयान मिशन’ असे या मोहिमेचे नाव आहे. माणूस अंतराळात पाठवण्यात आल्यानंतर याच गगनयान मिशनचा विस्तार करण्यात येणार असून या विस्तारा अंतर्गत अवकाश स्थानक अंतराळात पाठवण्यात येणार आहे.

अमेरिका आणि रशियाच
सध्या अवकाशात अमेरिका व रशियाचेच स्पेस स्टेशन आहेत. अमेरिका व रशियाने संयुक्त संशोधन प्रकल्पा अंतर्गत 1998 मध्ये आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक बनवले होते. त्यानंतर अनेक देश या मोहिमेशी जोडले गेले. आतापर्यंत 18 देशांचे 230 अंतराळवीर या अवकाश स्थानकावर जाऊन आले आहेत. पृथ्वीपासून 400 कि.मी. अंतरावर हे स्पेस स्टेशन स्थापित करण्यात आले आहे.

शुक्र आणि सूर्यावर स्वारी
चांद्रयान-2 मोहिमेची माहिती दिली होती. चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थान चांद्रयान पाठवणार असून ते 15 जुलै रोजी मोहिमेवर रवाना होईल. हे यान सहा किंवा सात डिसेंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या या भागाचे फारसे संशोधन झालेले नाही. या मोहिमेनंतर इस्रो शुक्र आणि सूर्यापर्यंत पोहचण्यासाठी मोहीम आखत असल्याचे के. सिवन यांनी सांगितले.