युवा ‘टीम इंडिया’ सातवे आसमान पे; किताबी लढतीत बांगलादेशवर रोमहर्षक विजय

429

हिंदुस्थानच्या 19 वर्षांखालील संघाने आशियाई चषक क्रिकेट स्पर्धेत शनिवारी आम्हीच राजेअसल्याचे दाखवून दिले. ‘टीम इंडियाच्या युवा शिलेदारांनी किताबी लढतीत बांगलादेशवर थरारक विजय मिळवत सातव्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरण्याचा पराक्रम केला. हिंदुस्थानचा डाव 32.4 षटकांत 106 धावांवर गडगडल्यानंतर बांगलादेशला 33 षटकांत 101 धावांत गुंडाळून हिंदुस्थानने सनसनाटी विजय मिळवला. या अशक्य वाटणाऱ्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मुंबईच्या अथर्व अंकोलेकरने बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला

बेस्ट कंडक्टरच्या मुलाची कमाल

किताबी लढतीत सामनावीर ठरलेल्या अथर्वचे वडील विनोद  अंकोलेकर हे बेस्टमध्ये कंडक्टर होते, मात्र वयाच्या नवव्या वर्षी अथर्वचे पितृछत्र हरपले. अथर्वची आई वैदेही अंकोलेकरही बेस्टमध्येच कंडक्टर आहेत, मात्र या सामान्य कुटुंबातील मुलाने युवा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत कमाल केली. हिंदुस्थानच्या 106 या अतिशय असुरक्षित धावसंख्येचा यशस्वी बचाव करताना अथर्वने मोलाची भूमिका बजावली. हिंदुस्थानसाठी क्रिकेटची खाण असलेल्या मुंबईमधून आणखी एक स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय  क्रिकेटच्या पटलावर उदय होत आहे.

हिंदुस्थानचा डाव गडगडला

कर्णधार धुव जुरेलने नाणेफेकीचा कौल जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय हिंदुस्थानच्या चांगलाच अंगलट आला. हिंदुस्थानचा डाव 32.4 षटकांत 106 धावांवर गडगडला. पाच फलंदाजांना केवळ एकेरी धावा करता आल्या तर तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. धुव जुरेल (33) व शाश्वत रावत (19) या मधल्या फळीतील फलंदाजांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शेवटी करण लालने 37 धावांची खेळी केली म्हणून हिंदुस्थानला धावांची शंभरी ओलांडता आली. बांगलादेशकडून मृत्युंजय चौधरी व शमीम होसैन यांनी 3-3 फलंदाज बाद केले, तर तंझीम हसन व शाहीम अलम यांनी 1-1 बळी टिपला.

फलंदाजांनी गमावले ते गोलंदाजांनी कमावले

बांगलादेश 107 धावांचे लक्ष्य सहज गाठणार असेच सर्वांना वाटत होते, मात्र हिंदुस्थानी गोलंदाजांनी कमाल केली. पहिल्या षटकापासून बांगलादेशला हादरे बसायला सुरुवात झाली अन् बघता बघता त्यांची 4.1 षटकांत 4 बाद 16 अशी दुर्दशा उडाली. येथूनच खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित झाल्या. कर्णधार अकबर अली (23) व मृत्युंजय चौधरी (21) यांनी काही वेळ हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार करीत बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. हे दोघे लागोपाठच्या षटकांत बाद झाल्यानंतर बांगलादेशची 21.1 षटकांत 8 बाद 78 अशी दाणादाण उडाली. तरीही तंझीम हसन (12) व रकीबुल हसन (नाबाद 11) या तळाच्या फलंदाजांनी अनपेक्षित प्रतिकार केल्याने सामन्यात रंगत निर्माण झाली. बांगलादेशला विजयासाठी 6 धावांची गरज असताना अथर्व अंकोलेकरने 33 व्या षटकात तंझीमला बाद करून हिंदुस्थानच्या मार्गातील उरलेला अडसर दूर केला. त्यानंतर आलेल्या शाहीम आलमचेही अखेरच्या चेंडूवर दांडके उडवून बांगलादेशचा डाव संपवला अन् हिंदुस्थानच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयाचा हीरो ठरलेल्या अथर्वने 28 चेंडूंत 5 फलंदाज बाद केले. आकाश सिंगने 3, तर विद्याधर पाटील व सुशांत मिश्रा यांनी 1-1 गडी बाद करून विजयास हातभार लावला.

आपली प्रतिक्रिया द्या