
गॅबावर आज वातावरण भन्नाट आहे. ढग, वारा आणि वेगवान विकेट, पण खरा गडबड गोंधळ तर मैदानात होणार आहे. कारण एकीकडे हिंदुस्थान मालिकेचा मुकुट डोक्यावर चढवण्यासाठी सज्ज आहे. दुसरीकडे कांगारूंच्या मनात एकच प्रार्थना, देवा, निदान बरोबरी तरी होऊ दे! निकाल कुणाच्या बाजूने लागतोय ते कळेलच. पण वन डे मालिकेतील पराभवाचा बदला घेत ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा हिशेब फिट्टमफाट करण्याचा हिंदुस्थानी संघाचा प्रयत्न असेल.
या मालिकेच्या पहिल्या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला वाटलं होतं, हे सोपं आहे. बुमराला खेळू, सूर्यकुमारला गुंडाळू आणि मालिका जिंकू. पण गोल्ड कोस्टच्या पिचवर अक्षर, वॉशिंग्टन आणि वरुण चक्रवर्ती यांनी त्यांच्या डोक्यावर फिरकीचं रॉकेट उडवलं. चेंडू वळला, बॅट चुकली आणि कांगारूंचा आत्मविश्वास गोलंदाजांच्या चेंडूसारखा जमिनीवर पडला. आता परिस्थिती अशी आहे की, ऑस्ट्रेलियाचा संघ आक्रमक क्रिकेट खेळत नाही,
तर अरे देवा, विकेट वाचवू दे. असं पुटपुटत खेळतोय. संपूर्ण संघात गोंधळ कुणी बॉल वाचवतंय, कुणी फिरकीचं स्वप्न पाहतोय. त्यांची स्थिती पाहून वाटतं, ‘या गब्ब्याच्या गवतावर नव्हे, तर मनात भीतीचं पीक उगवलंय!’
हिंदुस्थानी संघ तळ ठोकून तयार
दुसरीकडे हिंदुस्थानी खेळाडू जणू फिरकी म्हणजे आमचा चहाचा प्याला म्हणत उतरलेत. सूर्यकुमारच्या डोळय़ांत चमक, अक्षर पटेलच्या ओठावर मिश्कील स्मित आणि बुमराच्या हातात चेंडू म्हणजे जणू मोरपंखातील जादू. परवा चमत्कार करणारे अक्षर, वॉशिंग्टन आणि वरुण तिघेही धम्माल करण्यासाठी सज्ज आहेत. त्यांच्या जोडीला अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलकडेही गॅबावर चौकारांच्या वादळाने मालिकेचा शिक्का मारायची संधी चालून आली आहे. परिणामतः हिंदुस्थानी पुन्हा फिरकीचा मंत्र म्हणत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गॅबाच्या गवताऐवजी ‘गब्बर’ वाटायला लागले तरी कुणी आश्चर्य वाटून घेऊ नका.
गॅबाचं हवामान आणि वातावरण
गॅबाचं आकाश काळं, हवेत ओलावा आणि विजांचा कडकडाट पण सगळय़ात मोठा गडगडाट होणार आहे हिंदुस्थानी फलंदाजांच्या बॅटमधून. ऑस्ट्रेलियाला आशा आहे की, पाऊस येईल आणि सामना अर्धवट राहील, पण हिंदुस्थानी संघ म्हणतो, आम्ही पावसातही चौकार मारतो. गोल्ड कोस्टवर विजयी ठरलेला संघच गॅबावर धुमाकूळ घालायला उतरेल. तरीही एक-दोन बदल ऐनवेळी केले जातील. कारण मालिका 3-1 ने जिंकण्यासाठी सूर्यकुमार आणि संघ तितका जुगार खेळणारच. पण एक गोष्ट आनंदाची आहे, हिंदुस्थानी संघ आत्मविश्वासाने नाचतोय आणि यजमान भीतीने थरथर कापतंय. त्यामुळे निकाल थरारक लागतोय की भयानक, याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
कांगारूंचं बरोबरीचं स्वप्न
आता हे ऑस्ट्रेलियन्सही हट्टी. त्यांना जिंकायचं आहे आणि मालिकाही बरोबरीत सोडवायचीय. पण त्यांचा सूर पाहता ते सारे ‘ऍशेस’च्या वातावरणात मिसळलेत. त्यामुळे टी-20 मालिका त्यांच्या खिजगणतीतही नसल्याचे दिसतेय. त्यामुळे मालिका जिंकता येणे शक्य नसले तरी त्यांना सन्मानाची बरोबरी करायचीय. मॅक्सवेल आणि स्टॉयनिस हे दोघं अजूनही प्रयत्न करतायत. त्यांना गॅबा जिंकायचेय. पण त्यांची बॅटिंग म्हणजे जसं पावसात काडीपेटी पेटवण्याचा प्रयत्न. ठिणगी उठते, पण पेटत नाही!




























































