
कॅनबेरातील पहिला टी-20 क्रिकेट सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा सामना आज (दि. 31) मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (एमसीजी) रंगणार आहे. हा सामना जणू आगामी टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलची झलक असल्याने क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. जवळपास 90 हजारांहून अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. मात्र या तुल्यबळ लढतीला हवामानाची साथ मिळणेही तितकेच गरजेचे आहे.
ही मालिका पुढील वर्षी हिंदुस्थान आणि श्रीलंकेत होणाऱया टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीचा महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. दोन्ही संघ जगज्जेतेपदाचे दावेदार मानले जात असल्याने चाहत्यांमध्ये हा सामना विश्वचषक फायनलची झलक म्हणून पाहिला जात आहे. योगायोगाने या दोन्ही संघांची संभाव्य फायनलची रंगभूमीही हिंदुस्थानातील नरेंद्र मोदी स्टेडियम असू शकते. याच स्टेडियमवर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने ‘टीम इंडिया’ला पराभूत करून जगज्जेतेपद पटकाविले होते.
ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठीही ‘एमसीजी’वरील हा सामना विशेष ठरणार आहे. ‘ज्यांनी अद्यापि या मैदानावर आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही त्यांच्यासाठी ही अविस्मरणीय अनुभूती असेल,’ असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज नॅथन एलिसने सांगितले.
कॅनबेरातील 9.4 षटकांच्या अपूर्ण सामन्यात ‘टीम इंडिया’च्या आघाडीच्या फळीने दमदार खेळ केला. शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनी 10 चेंडूंमागे 10 धावांच्या गतीने फलंदाजी करीत मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली होती, मात्र ऑस्ट्रेलियाकडेही बलाढ्य फलंदाजी असून हिंदुस्थानच्या फिरकी तिकडीशी त्यांची लढत मेलबर्नमध्ये रोमहर्षक ठरण्याची शक्यता आहे.
टीम डेव्हिड अन् वरुण चक्रवर्ती
नॅथन एलिसप्रमाणेच टीम डेव्हिडलाही ‘एमसीजी’वर आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी अद्यापि मिळालेली नाही. 2022 च्या विश्वचषकात इंग्लंडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने त्याचे पदार्पण पुढे ढकलले होते. ‘एमसीजी’वरील त्याची ‘बीबीएल’ आकडेवारी विशेष प्रभावी नाही. त्याने नऊ डावांत केवळ 148 धावा (सरासरी 16.44) केल्या आहेत. मात्र या मालिकेत तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येत असल्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला अधिक स्थैर्य आणि धार मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाने फिरकीविरुद्धचा खेळ सुधारला असला, तरी त्यात भरीव सुधारणा दिसत नाहीये. हिंदुस्थानचा प्रमुख फिरकीपटू वरुण चक्रवर्ती सध्या जगातील अव्वल टी-20 गोलंदाज आहे. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अद्यापि ऑस्ट्रेलियाविरुद्ध गोलंदाजी केलेली नाही. मेलबर्नमध्ये त्याला मिशेल मार्श आणि ट्रव्हिस हेडविरुद्ध सुरुवातीच्या षटकांत वापरले जाण्याची शक्यता आहे. चक्रवर्तीने याच वर्षीच्या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ फायनलमध्ये हेडला रोखले होते.
संभाव्य उभय संघ
हिंदुस्थान – अभिषेक शर्मा, शुभमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, पुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमरा.
ऑस्ट्रेलिया – ट्रेव्हिस हेड, मिचेल मार्श (कर्णधार), जोश इंग्लिस (यष्टिरक्षक), टीम डेव्हिड, मिच ओवेन, मार्नस स्टोयनिस, जोश फिलिप, झेव्हियर बार्टलेट/सीन अॅबॉट, नॅथन एलिस, मॅट क्युन्हेमन, जोश हेजलवूड.
 
             
		




































 
     
    




















