वॉर्नर, पुकोवस्की, ऍबटची ऑस्ट्रेलियन संघात एण्ट्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेलबर्न कसोटीत हिंदुस्थानी संघाकडून पराभूत होणाऱया यजमान ऑस्ट्रेलियासाठी बुधवारी दिलासा देणारी घटना घडली. सिडनी व ब्रिस्बेन येथे होणाऱया तिसऱया व चौथ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली असून यामध्ये अनुभवी डेव्हिड वॉर्नर, सलामीवीर विल पुकोवस्की आणि वेगवान गोलंदाज सीन अॅबट या तिघांना स्थान देण्यात आले आहे. पहिल्या दोन कसोटींत अपयशी ठरलेल्या जो बर्न्सला मात्र बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय निवड समितीचे ट्रेव्हर होन्स यावेळी म्हणाले, जो बर्न्सला पहिल्या दोन कसोटींत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याला संघामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. तो बिग बॅश लीगमध्ये खेळू शकतो. डेव्हिड वॉर्नर, सीन अॅबट व विल पुकोवस्की यांची संघात एण्ट्री करण्यात आली आहे. डेव्हिड वॉर्नर दुखापतीमधून बरा होत आहे. तिसऱया कसोटीला अद्याप सात दिवस आहेत. त्यामुळे तो या कसोटीत खेळण्याची दाट शक्यता आहे. विल पुकोवस्कीसुद्धा ‘कनकशन’ या दुखापतीचा कालावधी पूर्ण करीत आहे. त्यामुळे त्याचाही तिसऱया कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघामध्ये समावेश होऊ शकतो.

जो बर्न्सला बाहेरचा रस्ता, हिंदुस्थानविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटींसाठी झाली निवड; सिडनीलाच होणार तिसरी कसोटी

सिडनी येथे गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील 7 जानेवारीपासून सिडनी येथे आयोजित करण्यात येणारी तिसरी कसोटी मेलबर्न येथेच हलवण्यात येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन देशांमधील तिसरी कसोटी नियोजित वेळापत्रकानुसार सिडनी येथेच होणार असल्याचे स्पष्ट करीत सर्व शंकाकुशंकाना पूर्णविराम दिला.

मेलबर्नमध्येच दोन्ही संघ सराव करणार

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनीला होणार आहे पण तिथे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे 4 जानेवारीपर्यंत हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांतील खेळाडू मेलबर्न येथेच सराव करणार आहेत, अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून यावेळी देण्यात आली.

ऑस्ट्रेलियाचा संघ

टीम पेन (कर्णधार), सीन अॅबट, पॅट कमिन्स, पॅमरून ग्रीन, मार्पस हॅरीस, जोश हेझलवूड, ट्रेव्हीस हेड, मोयसेस हेन्रीक्स, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, मायकेल नेसर, जेम्स पॅट्टीनसन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्प, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वॉर्नर.