
चेन्नई येथील पहिल्या कसोटीच्या पाटा खेळपट्टीवर हिंदुस्थानचा लाजिरवाणा पराभव झाला. या निराशाजनक कामगिरीनंतर क्युरेटर व खेळपट्टीवर चोहोबाजूंनी टीका करण्यात आली. त्यामुळे उद्यापासून चेन्नई येथेच खेळवण्यात येणाऱया दुसऱया कसोटीत फिरकी गोलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. याप्रसंगी विराट कोहलीची टीम इंडिया दुसऱया कसोटीत जो रूटच्या इंग्लंडची ‘फिरकी घेणार का, असा प्रश्न यावेळी उभा ठाकला आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठीही उद्यापासून सुरू होणारी लढत दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बघूया इंग्लंडचा संघ विजयी मालिका कायम ठेवतोय की विराट कोहलीची सेना ‘फिट्टमफाट करतेय ते…
पाहुण्यांच्या संघात चार बदल
इंग्लंडच्या संघात दुसऱया कसोटीसाठी चार बदल करण्यात आले आहेत. जो रूटने शुक्रवारी याबाबत माहिती दिली. जेम्स अॅण्डरसन, जोफ्रा आर्चर (जखमी), जोस बटलर, डॉम बेस या चौघांना रोटेशन पॉलिसीद्वारे बाहेर बसवण्यात आले असून त्यांच्याऐवजी ख्रिस वोक्स, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ओली पोप, ओली स्टोन, बेन पह्क्स यांना अंतिम 12 मध्ये संधी देण्यात आली आहे.
अक्षर पटेलला संधी
हिंदुस्थानी संघातही दुसऱया कसोटीसाठी बदल होणार हे निश्चित आहे. शाहबाज नदीम व वॉशिंग्टन सुंदर या दोघांनाही पहिल्या कसोटीत गोलंदाजीत आपला ठसा उमटवता आलेला नाही. त्यामुळे या दोघांना अंतिम अकरामध्ये संधी देण्यात येईल असे वाटत नाही. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलला अंतिम अकरामध्ये चान्स देण्यात येण्याची दाट शक्यता आहे. कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकालाच अंतिम 11मध्ये खेळवण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या आकडेवारीवर एक नजर
– हिंदुस्थानी संघाने दुसऱया कसोटीत विजय मिळवल्यास विराट कोहली महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाशी बरोबरी करेल. धोनीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने मायदेशात 21 विजय मिळवले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आतापर्यंत 20 कसोटी विजय संपादन केले आहेत.
– हिंदुस्थानला सलग दोन कसोटींमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तो 1999-2000 साली. दक्षिण आफ्रिकेने ती कसोटी मालिका 2-0 अशा फरकाने जिंकली होती. त्यानंतर मात्र अद्याप कोणत्याही संघाला सलग दोन कसोटींमध्ये हिंदुस्थानला हिंदुस्थानात हरवता आलेले नाही.
– रविचंद्रन अश्विनने उद्यापासून सुरू होणाऱया कसोटीत तीन फलंदाज बाद केल्यास त्याला हरभजन सिंगच्या मायदेशात टिपलेल्या 265 बळींना मागे टाकता येणार आहे. अनिल पुंबळेने मायदेशात सर्वाधिक 350 फलंदाज बाद केले आहेत.
या खेळपट्टीत दडलयं काय…
चेन्नईत होणाऱया दुसऱया कसोटीसाठी मैदानात उतरणाऱया दोन्ही संघांतील खेळाडूंना उन्हाचा त्रास सहन करावा लागणार आहे. वातावरणामध्ये कमालीची आर्द्रताही यावेळी असणार आहे. तसेच येथील खेळपट्टी पहिल्या दिवसापासूनच फिरकीला मदत करील अशी शक्यता सूत्रांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली आहे.
आजपासून दुसरी कसोटी
हिंदुस्थान-इंग्लंड, चेन्नई, सकाळी 9.30 वाजता
उभय संभाव्य संघ खालीलप्रमाणे
हिंदुस्थान – रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, पुलदीप यादव/वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह. इंग्लंड – डॉमिनिक सिबली, रोरी बर्न्स, डॅन लॉरेन्स, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन पह्क्स (यष्टिरक्षक), मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स/ओली स्टोन, जॅक लीच.























































