हिंदुस्थानच्या खडतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याला टी-२० क्रिकेट मालिकेने रविवारपासून (दि.१०) प्रारंभ होणार आहे. हिंदुस्थानच्या टी-२० संघात १७ खेळाडूंचा समावेश असून, यातील बहुतांश खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेत टी-२० खेळण्याचा अनुभव नाहीये. त्यामुळे या दौऱ्यावर हिंदुस्थानच्या युवा ब्रिगेडची खऱ्या अर्थाने परीक्षा असणार आहे.
उभय संघ
हिंदुस्थान: यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, इशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.
दक्षिण आफ्रिका : एडेन मार्करम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीट्जके, नांद्रे बर्गर, गेराल्ड कोएट्जी, डोनोवन फरेरा, रीजा हॅड्रिक्स, माकों जेन्सन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, ब्यूरन हॅड्रिक्स, एंडिले फेहलुकवायो, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिजाद विलियम्स,
टी-२० संघात सर्वांत तरुण संघ
दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी निवड झालेल्या हिंदुस्थानच्या टी-२० संघात ७ खेळाडूंचे वय २१ ते २५ वर्षांच्या दरम्यान, ५ खेळाडूंचे वय २६ ते २९ वर्षांच्या दरम्यान, तर ५ खेळाडूंचे बय ३० वर्षपिक्षा जास्त आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे, तर रवींद्र जाडेजा, श्रेयस अय्यर आणि कुलदीप यादव असे फक्त ४ अनुभवी खेळाडू संघात आहेत. सर्व खेळाडूंना टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव नक्कीच आहे. मात्र, त्यापैकी ७ खेळाडू असे आहेत जे १५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने देखील खेळू शकले नाहीत.
वर्ल्ड कपची रंगीत तालीम
आगामी वर्षी जूनमध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त यजमानीत टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप होणार आहे. या स्पर्धेपूर्वी टीम इंडिया केवळ ६ टी-२० सामने खेळणार आहे. यात ३ सामने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध, तर ३ सामने मायदेशात अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची फार कमी संधी मिळणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर चांगली कामगिरी करून हा फॉर्म आयपीएलपर्यंत टिकविणाऱ्या खेळाडूंना टी-२० वर्ल्ड कपसाठीच्या संघात स्थान मिळणार आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड या सलामीवीररांपैकी जैस्वाल व गिलला पहिल्या टी-२० सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे. ईशान किशन व जितेश शर्मा या यष्टीरक्षक फलंदाजांपैकी उद्या कोणाला संधी मिळते, ते बघावे लागेल. श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा या अनुभवी खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जबाबदारीने खेळावे लागणार आहे. याचबरोबर कुलदीप यादव व रवी बिश्नोई या फिरकी गोलंदाजांपैकी एकाला संघाबाहेर राहावे लागणार आहे. अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, मोहम्मद सिराज व दीपक चहर या वेगवान चौकडीपैकी चहरला पहिल्या सामन्यात बाकावर बसावे लागेल, असे वाटते.
दक्षिण आफ्रिकेचे कडवे आव्हान
दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानात झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामुळे घरच्या मैदानावर खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेकडून ‘टीम इंडिया’ला टी-२० मालिकेत कडवे आव्हान मिळणार आहे. यजमान संघही युवा खेळाडूंनी सजलेला आहे. शिवाय काही अनुभवी खेळाडूंमुळे हा संघ समतोल वाटतोय. दक्षिण आफ्रिकेच्या आक्रमक फलंदाजीला ‘टीम इंडिया’चे गोलंदाज कशी वेसन घालणार, यावर या मालिकेचे भवितव्य अवलंबून असणार आहे.