Asia Cup Final 2023 – हिंदुस्थान-श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट…कोणाला होणार फायदा?

आशिया चषक 2023 च्या अंतिम फेरीत रविवारी श्रीलंका आणि टिम इंडियात सामना रंगणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा या स्पर्धेत आमने-सामने येत आहेत. याआधी सुपर 4 फेरीत दोन्ही संघाचा मुकाबला झाला होता. त्यात टिम इंडियाने 41 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे या अंतिम सामन्याची उत्कंठा वाढली आहे. रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात टिम इंडियाने विजय मिळवल्यास आठव्यांदा आशिया कप जिंकणारा संघ ठरणार आहे. हा एक विक्रम असेल. त्यामुळे विक्रम प्रस्थापित करण्यासाठी टिम इंडिया सज्ज झाली आहे.

दोन्ही संघात आशिया चषकासाठी 20 एकदिवसीय सामने झाले आहेत. त्यातील 10 सामने टिम इंडियाने तर 10 सामने श्रीलंकेने जिंकले आहेत. त्यामुळे दोन्ही संघात रविवारी चुरस दिसणार आहे. टिम इंडियाने याआधी 7 वेळा आशिया चषक जिंकला आहे. त्यात 5 वेळा टिम इंडियाने श्रीलंकेवरच विजय मिळवला आहे. टिम इंडियाची मदार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असेल. तर श्रीलंकेच्या स्पिनरकडून टिम इंडियाला तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. या सामन्याची चुरस बघण्यासाठी क्रिकेटरसिकांची उत्कंठाही वाढली आहे. या अंतिम सामन्याची सर्व तिकिटे विकली गेली असून हा सामना हाऊसफूल्ल झाला आहे. या सामन्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेत तिकिटे घेतलेल्या क्रिकेटरसिकांना वेळेपूर्वी स्टेडियममध्ये पोहचण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा अंतिम सामना टिम इंडियाने जिंकला तरीही त्याचा फायदा पाकिस्तानी संघाला होणार आहे. आयसीसी रॅकिंगमध्ये पाकिस्तानी संघ अव्वल ठरणार आहे. त्यामुळे टिम इंडियाने विजय मिळवला तरी त्याचा फायदा पाकिस्तानला होणार आहे. रविवारच्या या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. रविवारी कोलंबेमध्ये 90 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामना सुरू झाल्यावरही त्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पावसामुळे रविवारचा सामना रद्द झाल्यास राखीव दिवशी म्हणजे सोमवारी हा सामना खेळवण्यात येणार आहे. राखीव दिवशीही पावसामुळे सामना होऊ शकला नाही तर दोन्ही संघाला संयुक्त विजेते घोषित करण्यात येणार आहे.