
सामना ऑनलाईन । लखनौ
कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट मालिकेत दबदबा राखलेल्या हिंदुस्थानने वेस्ट इंडीजला त्यांच्या आवडत्या टी-20 क्रिकेटमध्येही सलामीला धूळ चारली. आता सलग दुसरा टी-20 सामना जिंकून उद्याच मालिकाविजय साजरा करण्याचा ‘टीम इंडिया’चा निर्धार असेल.
दुसरीकडे यजमानांवर पटलवार करून तीन सामन्यांच्या मालिकेतील आव्हान राखण्याच्या इराद्याने विंडीज संघ मैदानावर उतरेल. रोहित शर्मा पहिल्या सामन्यात अपयशी ठरला. आता लखनौमध्ये तो त्याची भरपाई करण्यासाठी उत्सुक असेल. रोहितप्रमाणेच शिखर धवन, लोकेश राहुल, रिषभ पंत व मनीष पांडे हेही सलामीच्या लढतीत आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करू शकले नाहीत. यातील आज कोण संधीचे सोने करतो ते पाहणे रंजक ठरेल.




























































