एकच लक्ष्य मालिका विजय

390

हिंदुस्थान – वेस्ट इंडीज यांच्यामध्ये बुधवारी मुंबईत वानखेडे स्टेडियममध्ये अखेरचा टी-२० सामना रंगणार असून याप्रसंगी उभय संघ मालिका विजयाचे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून मैदानात उतरणार आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकल्यामुळे तिसऱ्या लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यामध्ये विराट कोहलीची टीम इंडिया बाजी मारतेय की कायरॉन पोलार्डचा वेस्ट इंडीज संघ वरचढ ठरतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे.

वल्र्ड कप अजून दूरच – रोहित
टी-२० वल्र्ड कप पुढल्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणार आहे. मात्र त्याला अद्याप अवकाश आहे. आमचे सध्या लक्ष्य आहे ते मालिका विजयावर, असे स्पष्ट मत रोहित शर्मा याने लढतीच्या पूर्वसंध्येला व्यक्त केले.

वॉिंशग्टन, रिषभला पुन्हा संधी?
हिंदुस्थान – वेस्ट इंडीज यांच्यामध्ये जिंकू किंवा मरू’ अशीच लढत होणार असून यावेळी वॉशिंग्टन सुंदर व रिषभ पंत या खेळाडूंच्या कामगिरीवर साऱ्यांच्या नजरा असणार आहेत. वॉशिंग्टन सुंदरच्या गेल्या २३ षटकांमध्ये १४४ धावांची लूट करण्यात आली. तसेच गेल्या पाच सामन्यांमध्ये त्याला फक्त तीनच फलंदाज बाद करता आलेत. क्षेत्ररक्षणातही त्याने सुमार कामगिरी केली. त्याच्याऐवजी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात येऊ शकते. वॉशिंग्टन सुंदरसह रिषभ पंतचाही कस लागणार आहे. गेल्या सहा डावांमध्ये त्याला नाबाद ३३, १८, ६, २७, १९, ४ एवढ्याच धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याच्याऐवजी संजू सॅमसनला संधी मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको.

वल्र्ड कपच्या आठवणी
हिंदुस्थान – वेस्ट इंडीज यांच्यामध्ये २०१६ साली झालेल्या टी -२० वल्र्ड कपमधील उपांत्य सामना रंगला होता. ही लढत मुंबईतच पार पडली. या लढतीत वेस्ट इंडीजने हिंदुस्थानला हरवून पुढे स्पर्धा जिंकण्याचा पराक्रमही करून दाखवला होता. बुधवारी होणाऱ्या लढतीच्या पार्श्वभूमीवर टी-२० वल्र्ड कपच्या आठवणी जाग्या झाल्या.

फलंदाज फॉर्मात
लोकेश राहुल, विराट कोहली, शिवम दुबे या हिंदुस्थानच्या फलंदाजांनी चमकदार फलंदाजी करीत आपण फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले. रोहित शर्माला पहिल्या दोन लढतींत अपयश आले असले तरी तिसऱ्या लढतीत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. दीपक चहरने बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत आपला ठसा उमटवला असला तरी वेस्ट इंडीजविरुद्धच्या लढतींमध्ये त्याला धमक दाखवता आलेली नाही.

मुंबई इंडियन्समधून खेळण्याचा फायदा पाहुण्यांना
हिंदुस्थान – वेस्ट इंडीज यांच्यामधील अखेरचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. मुंबईतील हे ग्राऊंड हिंदुस्थानसाठी यजमानी भूषवत असले तरी त्याचा फायदा पाहुण्या वेस्ट इंडीजला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्णधार कायरॉन पोलार्ड, एविन लुईस व लेण्डल सिमन्स या तिघांनीही आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टीचा रागरंग त्यांना चांगलाच ठावुक आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा वगळता एकही खेळाडू हिंदुस्थानी संघात नाही. त्यामुळे उद्याच्या लढतीत दोन्ही संघांना समसमान संधी असेल यात शंका नाही.

माही संघाचे ओझे बनणार नाही!
महेंद्रिंसह धोनी निवृत्त होणार की आगामी टी-२० वल्र्ड कपपूर्वी पुन्हा निळी जर्सी परिधान करणार याबाबत क्रिकेट वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, धोनीच्या निवृत्तीचा निर्णय तोच घेईल, असे सावध विधान आतापर्यंत सर्वजण करताना दिसताय. ‘टीम इंडिया’चे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनाही पत्रकारांनी धोनी आगामी टी-२० वल्र्डकप खेळणार का, असा सवाल विचारला. त्यावर बोलताना शास्त्री यांनी ‘माही असा खेळाडू आहे, तो कधीच संघाचे ओझे बनून खेळणार नाही,’ असे परखड मत व्यक्त केले.

रवी शास्त्री म्हणाले, ‘धोनी एक महान खेळाडू आहे. मी त्याला जेवढे ओळखतो त्यावरून सांगतो, तो कधीच संघाचे ओझे बनणार नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे ‘आयपीएल’नंतर आपण ‘टीम इंडिया’साठी खेळू शकतो, असे धोनीला वाटल्यास त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये,’ असे आवाहनही शास्त्री यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या