
गुलाबी चेंडूवर प्रथमच खेळल्या गेलेल्या आणि क्रिकेटच्या इतिहात पहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार्या ‘टीम इंडिया’ने दुसर्या कसोटीत बांगलादेशचा 1 डाव 46 धावांनी धुव्वा उडविला. या विजयासह विराट कोहलीच्या सेनेने दोन सामन्यांची मालिका 2-0 फरकाने जिंकून निर्भेळ यश संपादन केले. हिंदुस्थानने सलग 12 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला हे विशेष. शिवाय डावाच्या फरकाने सलग चौथी कसोटी जिंकणारा हिंदुस्थान हा पहिला देश ठरला. याचबरोबर हिंदुस्थानने कारकीर्दीत प्रथमच सलग सातवा कसोटी विजय संपादन केला, तर सलग सातव्यांदा पहिला डाव घोषित करणारा हिंदुस्थान हा क्रिकेटविश्वातील पहिला संघ ठरला. दोन्ही नऊ बळी टिपणारा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा या सामन्याचा मानकरी ठरला, तर मालिकावीराची माळही त्याच्याच गळ्यात पडली.
‘टीम इंडिया’ शिखरावर
‘टीम इंडिया’ने ‘आयसीसी’ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत गुणतालिकेत मोठी झेप घेतली. विराटची सेना सध्या सलग सात कसोटी जिंकून 360 गुणांसह शिखरावर आहे. हिंदुस्थानच्या आसपास दुसरा संघ नाही. दुसर्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने सहा कसोटींत 116 गुणांची कमाई केलेली आहे. त्यानंतर न्यूझीलंड (60), श्रीलंका (60) व इंग्लंड (56) अनुक्रमे तिसर्या चौथ्या व पाचव्या स्थानावर आहेत.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश पहिला डाव : 106 धावा.
हिंदुस्थान पहिला डाव : 9 बाद 347 धावा (घोषित)
बांगलादेश दुसरा डाव : सादमान इस्लाम पायचित गो. इशांत 0, इमरुल कायेस झे. कोहली गो. इशांत 5, मोमिनुल हक झे. साहा गो. इशांत 0, मोहम्मद मिथ्dgन झे. शमी गो. उमेश 6, मुश्फिकुर रहीम झे. जाडेजा गो. उमेश 74, मोहमूदुल्लाह रिटायर्ड हर्ट 39, मेहदी हसन झे. कोहली गो. इशांत 15, तैजुल इस्लाम झे. रहाणे गो. उमेश 11, इबादत हुसैन झे. कोहली गो. उमेश 0, अल-अमिन हुसैन झे. साहा गो. उमेश 21, अबू जायेद नाबाद 2.
एकूण : 41.1 षटकांत सर्वबाद 195 धावा.
गोलंदाजी : इशांत शर्मा 13-2-56-4, उमेश यादव 14.1-1-53-5,
इशांत शर्माचे नऊ बळी
बांगलादेशला 106 धावांत गुंडाळल्यानंतर ‘टीम इंडिया’ने 9 बाद 347 धावसंख्येवर डाव घोषित करून पहिल्या डावात 241 धावांची आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा दुसरा डाव 41.1 षटकांत 195 धावांवर गारद झाल्याने ‘टीम इंडिया’ने डावाने विजय मिळविला. 6 बाद 152 धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केलेल्या बांगलादेशचा रविवारी अवघ्या 47 मिनिटांत खेळ खल्लास झाला. पहिल्या डावात 5 बळी टिपणार्या इशांत शर्माने दुसर्या डावातही 4 फलंदाज बाद केले. त्याने शादमान इस्लाम (0), इमरूल कायेस (5), मोमिनुल हक (0) ही आघाडीची फळी कापून काढल्यानंतर मेहदी हसनचाही (15) बळी मिळवला.
डाव घोषित करण्याचाही विक्रम
सलग सातव्यांदा डाव घोषित करणारा ‘टीम इंडिया’ या कसोटी क्रिकेटमधील पहिला देश ठरला आहे. याआधी इंग्लंडने 2009 मध्ये सलग सहा वेळा डाव घोषित केला होता.
डावाने सलग चार कसोटी जिंकण्याचा विक्रम
विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ने डावाने सलग चार कसोटी जिंकण्याचा विश्वविक्रम केला. हिंदुस्थानने पुणे कसोटीत दक्षिण आफ्रिकेला एक डाव 137 धावांनी, तर रांची कसोटीत एक डाव 202 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर बांगलादेशला इंदूर कसोटीत एक डाव 130 धावांनी, तर कोलकाता कसोटीत एक डाव 46 धावांनी धूळ चारली.
कोहली पाचवा पिंक कसोटी शतकवीर कर्णधार
कोलकाता क्रिकेटमध्ये ‘टीम इंडिया’चा कर्णधार विराट कोहलीने 136 धावांची खेळी करताना कारकीर्दीतील 27 वे, तर दिवस-रात्र कसोटीतील पहिले शतक झळकावले. याचबरोबर गुलाबी चेंडूवर शतक ठोकणारा कोहली क्रिकेटविश्वातील 16 वा क्रिकेटर तर पाचवा कर्णधार ठरला. पाकिस्तानच्या अझहर अलीने दिवस-रात्र कसोटीतील पहिले शतक झळकावले होते. त्याने ऑक्टोबर 2016 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 302 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. गुलाबी चेंडूवर दोन शतके झळकावण्याचा मान पाकिस्तानच्या असद शफीकच्या नावावर आहे.




























































