हिंदुस्थानचा पदकांचा पंच; नेमबाजीत दोन तर रोईंगमध्ये तीन पदकांची कमाई

आशियाई क्रीडा स्पर्धेत रविवारी हिंदुस्थानने पाच पदकांची लयलूट केली. यात नेमबाजीत एक रौप्य व एक कांस्य, रोईंगमध्ये दोन रौप्य व एक कांस्य अशी एकूण पाच पदके जिंकली. हिंदुस्थानकडे अजून पदके जिंकण्याची मोठी संधी आहे. टेबल टेनिस, बॉक्सिंग, हॉकी व क्रिकेटमध्येही हिंदुस्थानला पदके मिळणार आहेत.

नेमबाजीने उघडले पदकाचे खाते
मेहुली घोष, रमिता आणि आशी चोक्सी या हिंदुस्थानी महिला त्रिकुटाने 10 मीटर एअर रायफलमध्ये रौप्यपदक जिंकून आपल्या देशाचे खाते उघडले. हिंदुस्थानी संघाने एकूण 1886 गुणांची कमाई करीत हे रुपेरी यश संपादन केले. यात रमिताने 631.9 गुण मिळवले, तर मेहुलीने 630.8 व आशीने 623.3 गुण मिळविले. या स्पर्धेत यजमान चीनने सुवर्णपदकाची कमाई केली, तर मंगोलियाने कांस्यपदक जिंकले. त्यानंतर रमिता जिंदलने हिंदुस्थानला नेमबाजीतील दुसरे पदक जिंकून दिले. तिने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये कांस्यपदकाची कमाई केली.

रोईंगमध्ये तीन पदकांची लयलूट
हिंदुस्थानला नेमबाजीबरोबरच रोईंगमध्येही दोन पदके मिळाली. नेमबाजीत रौप्यपदकानंतर काही वेळातच हिंदुस्थानला डबल स्कल्समध्ये तिरंगा फडकाविण्याची संधी मिळाली. पुरुषांच्या लाइटवेट डबल स्कल्स प्रकारात अर्जुन सिंग आणि जाट सिंग यांनी 6:28:18 अशा वेळेसह हिंदुस्थानला रौप्यपदक जिंकून दिले. या स्पर्धेचे सुवर्णपदक यजमान चीनने पटकाविले. त्यानंतर बाबूलाल यादव व लेख राम या हिंदुस्थानच्या पुरुष जोडीने अंतिम फेरीत 6 मिनिटे 50.41 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. यजमान चीनने येथेही सुवर्णपदक पटकाविले, तर उझबेकिस्तानला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर रोईंग मेन्स 8 मध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी रौप्यपदक जिंकून या क्रीडा प्रकारातील तिसरे पदक पटकाविले.

दृष्टीक्षेपात…
– टेबल टेनिसमध्यो हिंदुस्थानच्या पुरुष संघाने कझाकिस्तानचा पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली.
– बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानच्या प्रीतीने उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिने जॉर्डनच्या एस. अलहसनतचा पराभव केला. आता प्रीतीपुढे कझाकिस्तानच्या जेड शेकेरबेकोवाचे आव्हान असेल.
– हिंदुस्थानच्या पुरुष व्हॉलीबॉल संघाचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. त्यांना जपानने 3-0 फरकाने हरविले. दक्षिण कोरिया व तैवानसारख्या बलाढय़ संघाला हरविणाऱ्या हिंदुस्थानला जपानचे आव्हान परतवता आले नाही. आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानने 8 सुवर्णपदके जिंकली आहेत.
– स्टार जलतरणपटू श्रीहरी नटराज आणि महिला फ्रीस्टाईल रिले संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. श्रीहरी नटराजने पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोक प्रकारात, तर महिला रिले संघाने 4 बाय 100 मीटर शर्यतीत आगेकूच केली.
– तलवारबाजीत तनीक्षा खत्रीला महिलांच्या वैयक्तिक स्पर्धेत उपांत्यपूर्व लढतीत पराभव पत्करावा लागला. दोन वेळच्या जगज्जेत्या व्हिवियन कोंग हिने तिला 15-7 गुणांनी हरविले.
– टेनिसमध्ये रामकुमार रामनाथन व साकेत मायनेनी या द्वितीय मानांकित हिंदुस्थानी जोडीने पुरुष दुहेरीमध्ये विजयी सलामी दिली. हिंदुस्थानी जोडीने नेपाळच्या जोडीचा 6-2, 6-3 असा पराभव केला.